उद्योजक राम रेड्डी यांना सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

 विद्यापीठास 20 वर्षे पूर्ण; गुरुवारी विविध कार्यक्रम

image source

 By Kanya News||

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक  राम रेड्डी यांना जाहीर झाल्याची माहिती कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांनी  पत्रकार परिषदेत केली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. यात सोलापूर ही जन्मभूमी, कर्मभूमी व ऋणानुबंध असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी राम रेड्डी हे ठरले आहेत. सामाजिक व उद्योग क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडून जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी श्री रेड्डी यांना विनंती करण्यात आली, त्यांनी सदरील विनंती स्वीकारली आहे. रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 गुरूवार, दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी विद्यापीठाचा २० वा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे. सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम कुलगुरू प्रा. महानवर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या समारंभास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगरचे कुलगुरू प्रा. विजय फुलारी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले, प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

image source

विद्यापीठाच्या विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते, त्यानुसार तज्ञ समितीने विविध पुरस्कारांची देखील निवड केली आहे. या ही पुरस्कारांचे वितरण गुरुवारी होणार आहे. विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेसाठी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, डॉ. अंबादास भास्के आदी उपस्थित होते.

 पुरस्काराचे मानकरी : 

  • 1) उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार: सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ ( कमलापूर, ता. सांगोला)
  • 2) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय (अनगर, ता. मोहोळ)
  • 3) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार : प्राचार्य डॉ. चंद्रकांत श्रीपती सूर्यवंशी, बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय (अनगर)
  • 4)  उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (विद्यापीठ):
  •       डॉ. बाळकृष्ण जगन्नाथ लोखंडे, संचालक, पदार्थविज्ञान संकुल
  •        डॉ. गौतम सुभाना कांबळे, संचालक, सामाजिकशास्त्रे संकुल
  • 5) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय):
  • डॉ. वीरभद्र चनबस दंडे, डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर
  • डॉ. आयेशा रंगरेज, कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर
  • 6) उत्कृष्ट शिक्षकेत्तर अधिकारी पुरस्कार (वर्ग एक व दोन विद्यापीठ): आनंदराव बहिरू पवार, सहाय्यक कुलसचिव
  • 7) उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (वर्ग तीन विद्यापीठ): रूपाली विजयकुमार हुंडेकरी, वरिष्ठ लिपिक
  • 8) उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (वर्ग चार विद्यापीठ): नामदेव यशवंत सोनकांबळे, वाहनचालक
  • 9)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (लिपिक संवर्गीय महाविद्यालय): कैलास भागवत सातव, मुख्य लिपिक भारत महाविद्यालय (जेऊर)
  • 10)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (चतुर्थश्रेणी कर्मचारी महाविद्यालय): अभिजीत बाळासाहेब जाधव, ग्रंथालय परिचर, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, (पंढरपूर)
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *