राजवर्धन विद्यालयाचा बालदिंडी सोहळा उत्साहात साजरा
By Kanya News|
सोलापूर : शेळगी येथील राजवर्धन विद्यालयाचा आषाढी एकादशीनिमित्त आयोजित केलेला बालदिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. हर्षवर्धन बालक मंदिर व राजवर्धन विद्यालय या शाळेचे सर्व बालगोपाल विठ्ठल रुक्मिणी, विविध संत आणि वारकऱ्यांच्या पोशाखात दिंडीमध्ये सहभागी झाले होते. बालदिंडीमुळे शेळगी परिसरात जणू पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब ऑफ सोलापूर मिडटाऊनचे नूतन अध्यक्ष बाळप्पा बेंद्रे, सहसचिव देवेंद्र बिराजदार, कोषाध्यक्ष रोहन बिराजदार, ज्येष्ठ नागरिक शिवराज बागलकोटी, अभियंता वीरेश बागलकोटी व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन व पालखीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णा हिरेमठ यांनी प्रास्ताविक करताना शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती विशद केली.सूत्रसंचालन सहशिक्षिका आशा भांगे यांनी केले तर आभार सहशिक्षक सोमशेखर स्वामी यांनी मानले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून वीरेश बागलकोटी यांच्या विहान या एक वर्षाच्या मुलाचा शाळेमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त बागलकोटी परिवाराच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले. लायन्स क्लबच्यावतीने बाळाप्पा बेंद्रे यांनी मुलांना केळी वाटप केले. यानंतर शाळेतील बाल गोपाळांची दिंडी मार्गस्थ झाली. बालदिंडी शाळेपासून निघून आदर्श नगर, लक्ष्मीनारायण नगर, शिवगंगा नगर, योगायोग नगर या मार्गे पुन्हा प्रशालेत विसावली.