उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर; राज्यातील ३० हजार शिक्षकांना सात दिवस  प्रशिक्षण दिले जाणार

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) गुरुवारी (दि.२६ डिसेंबर २०२४) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची जबाबदारी हाती घेत असून, त्यांनी शिक्षण सुधारणेचा त्रिसूत्री कार्यक्रम शिक्षण विभागाला दिला आहे. विद्यार्थी,शिक्षक आणि पालक (Students, teachers and parents) यांच्यापर्यंत पोहोचून शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी केल्या जाणार आहेत. त्यात वाचन चळवळ वाढविणे, शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे आणि पालकांना जागृत करणे यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, असे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानुसार राज्याच्या उच्च शिक्षण संचालक कार्यालयातर्फे एक जानेवारीपासून वाचन चळवळ वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील ४५ लाख विद्यार्थ्यांना एक पुस्तक वाचण्यास दिले जाणार आहे. केवळ ठराविक शहरांमध्येच नाही तर राज्यभरात वाचन चळवळ वाढावी, या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. हा उपक्रम केवळ एका वर्षापुरता राहणार नाही तर सातत्याने केला जाणार आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

डॉ.शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना सुद्धा आवश्यक प्रशिक्षण देण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार राज्यातील ३० हजार शिक्षकांना सात दिवस  प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठीचा आवश्यक अभ्यासक्रम तयार केला जात आहे. हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाईल. त्यातून एनईपी व इतर गोष्टींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातील.

विद्यार्थी, शिक्षक यांच्याबरोबरच पालक हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाविषयी पब्लिक अवेअरनेस आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचून शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना उपक्रम यांची माहिती दिली जाणार आहे, असे शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact