गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांचे गौरवोद्गार; बोरामणीच्या ग्लोबल व्हिलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : विद्यार्थी केंद्रबिंदू मानून ग्रामीण भागात सीबीएसईसोबतच नई तालीम व अटल टिंकरिंग लॅबची जोड देऊन ग्लोबल व्हिलेज शिक्षण संकुल जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे. मी गोकुळ शुगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करतो तर ग्लोबल व्हिलेज शेतकरी-शेतमजुरांच्या मुलांसाठी काम करते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचे इंग्रजी संभाषण पाहून ही संस्था खरंच ग्रामीण भागातील आहे का? असा प्रश्न पडतो, असे गौरवोद्गार ग्लोबल व्हिलेज शिक्षण संकुल, बोरामणीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना गोकुळ साखर कारखाना, धोत्रीचे चेअरमन दत्ता बलभीम शिंदे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी होते. याप्रसंगी व्यासपीठावर सचिवा संगिता शहा- चनशेट्टी, बोरामणीचे सरपंच प्रा. डॉ. राज साळुंखे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. अनिकेत चनशेट्टी, खजिनदार सुजाता बादोले, विश्वस्त सरोजिनी करुटी, वैशाली चनशेट्टी, राजश्री चनशेट्टी, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष पंडीतमामा आचलेरे, प्राचार्या आसमा नदाफ, प्राचार्य डॉ. शंकर राठोड, पालक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
- दत्ताभाऊ शिंदे यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देत सांगितले की, “माझ्या शालेय जीवनातील दिवस आज पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभे राहिले. या संस्थेतील शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास पाहून खूप अभिमान वाटतो. या शाळेने यावर्षी बोरामणीसारख्या ठिकाणाहून सोलापूरमधील हुतात्मा मंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करून मोठी झेप घेतली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. ग्लोबल व्हिलेजच्या विद्यार्थ्यांना भविष्यात ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्य करावे, असे मला वाटते. मी या संस्थेच्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी चालविलेल्या शिक्षणाच्या मोहिमेला मनापासून शुभेच्छा देतो.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन, अटल टिंकरिंग लॅबमधील प्रकल्प पाहून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे, गांधीजींच्या नई तालीम संकल्पनेतून तयार केलेल्या वस्तू पाहून भारावून गेले. ते म्हणाले, “ग्लोबल व्हिलेजचे विद्यार्थी भविष्यात प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असतील. ग्रामीण भागातील अशा संस्थेच्या प्रगतीसाठी मी नेहमीच पाठिंबा देईन.”
आदर्श विद्यार्थी प्रतियोगीता पुरस्कार वितरण…
दरवर्षी दिला जाणारा कै. चि. अथर्व दयानंद झुरळे स्मरणार्थ आदर्श विद्यार्थी पुरस्कार यावर्षी इयत्ता बारावीतील साक्षी भोसले या विध्यार्थीनीला प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी दयानंद झुरळे, कमलाकर भोसले, अरूण शिंदे, रवी म्हस्के, सौ. हाके यांच्यासह सोलापूर, बोरामणी, मुस्ती, तांदुळवाडी, वडजी, देवसिंगा, खानापूर, इटकळ आदी गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रेया अचलारे, श्रेयश पोतदार, श्रेया गुंड, सानिका जगताप, श्रेयश गुंड यांनी केले. आभारप्रदर्शन मल्लिनाथ जळकोटे यांनी केले.कार्यक्रमाचा समारोप ‘वंदे मातरम्’ या गीताने करण्यात आला.