मतदार यादीचा सुधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर; मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
By Kanya News||
सोलापूर : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा दि. १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकाच्या आधारावर “विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (दुसरा)” राबविण्यात येत आहे. या कालावधीत मतदारांनी नोंदणी केलेले नाव, पत्ता, वय व इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच त्यात दुरुस्तीची आवश्यकता असल्यास या कालावधीत संबंधित तपशील दुरुस्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
- या कार्यक्रमाअंतर्गत शुक्रवार, दि. २ ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारुप यादीच्या अनुषंगाने मतदार यादीवरील दावे व हरकती शुक्रवार, दि. २ ऑगस्ट ते शुक्रवार, दि. १६ ऑगस्ट या कालावधीत स्विकारण्यात येणार आहे. प्राप्त हरकती आणि आक्षेपांवर दि. २६ ऑगस्टपर्यंत कार्यवाही करण्यात येईल. त्यांनतर मंगळवार, दि. २७ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
तसेच मतदार नोंदणी नियम, १९६० मध्ये देखील सुधारणा करण्यात आलेल्या असून, दि. १ जानेवारी, १ एप्रिल,१ जुलै व १ ऑक्टोबर या चार अर्हता दिनांकावर १८ वर्ष पूर्ण झालेल्या व त्यावरील सर्व नागरीकांनी www.voters.eci.gov.in व Voter helpline App (VHA) च्या माध्यमाने नोंदणी करावी. मतदार यादीमध्ये आपले नावं आहे कि कसे हे शोधण्यासाठी www.electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच आपल्या क्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय व सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा दुरध्वनी क्रमांक 1950 यावरती संपर्क साधावा.
आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आपली नांवे, फोटो, पत्ता व इतर बाबी मतदार यादीमध्ये तपासून घ्यावीत. ज्यांच्या दुरुस्ती असतील त्यांनी दुरुस्ती करुन घ्यावी. ज्या नागरीकांची नांवे मतदार यादीमध्ये नाहीत अशा नागरिकांनी ऑनलाईन, बीएलओ व मतदार नोंदणी कार्यालय या ठिकाणी जाऊन आपली नांवे मतदार यादीत नोंदवून घ्यावीत. असे आवाहनही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.