उजनी लाभक्षेत्र धारकांची रविवारी पंढरपुरात विचार विनिमय बैठक
By Kanya News||
सोलापूर: उजनी लाभक्षेत्र धारकांची रविवारी (दि. २७ जुलै) रोजी सकाळी ११ वाजता पंढरपुरातील धनश्री पतसंस्था लिंक रोड (पंढरपूर) येथे विचार विनिमय बैठक आयोजित केले आहे, अशी माहिती धनश्री परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या बैठकीत उजनी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी दरवर्षी दि. १५ ऑक्टोबर रोजी उजनी धरणासह भिमा खोऱ्यातील सर्व धरणातील पाण्याची पातळी समान करणे, सरकारी धोरणानुसार उजनी धरणाची समुद्रसपाटीपासूनची उंची ४९१.०३० मीटर आहे. तिथपर्यंत उंचीचा पाणीसाठा ६३. ६६० टीएमसी आहे. तो पाणीसाठा मृतसाठा समजला जातो. उजनी धरणाची कॅनॉल बेड लेव्हल समुद्र सपाटीपासूनची उंची ४८७. २०० मीटर आहे. तिथंपर्यंत उंचीचा पाणीसाठा ३०.०० टीएमसी आहे. अशा परिस्थितीत ६३. ६६० टीएमसी ३०. ०० टीएमसी म्हणजे ३३. ६६० टीएमसी जाडा पाणी कॅनॉलमधून शेतीसाठी मिळू शकतो. म्हणून कॅनॉल बेड लेव्हलपर्यंत धरणातील पाणी शेतीसाठी कॅनॉलमधून सोडणे आवश्यक आहे. उजनी कालवा सल्लागार समितीवर शेतकऱ्याचे योग्य प्रतिनिधी घेणे, कॅनॉल आवर्तनाची पुर्नरचना करणे, सोलापूर जिल्हातील भीमा, सीना, माण आदी नद्यांवर बॅरेजेस बंधारे बांधून पावसाळ्यामध्ये वाया जाणारे पाणी साठवून शेतीसाठी उपलब्ध करून द्यावेत आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. असे भारत पवार यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस भारत पवार, विक्रांत पंडित, बिरप्पा जाधव, सचिन पाटील, संभाजी गरड आदी उपस्थित होते.