रौप्य महोत्सवानिमित्त दि. २७ व २८ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सोलापूरमध्ये गेल्या २५ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वर प्रतिष्ठान संचलित, सुयश गुरुकुलच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी सुयश गुरुकुल येथे युवा स्फूर्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती सुयश गुरुकुलचे संस्थापक केशव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वामी विवेकानंद यांच्या ‘मनुष्य घडणीचे शिक्षण’ या तत्त्वावर आधारित कार्य सुयश गुरुकुल मागील २५ वर्षापासून कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक केशव शिंदे यांच्या ध्यान आणि प्राणायामाने निवासी विद्यार्थ्यांची पहाट व गुरुकुलाचा परिसर एका सकारात्मक ऊर्जेने चैतन्यमय होतो. गोविंद देवगिरी महाराज, बाबा महाराज सातारकर, चैतन्य महाराज देगलुरकर, बाबा रामदेव, श्री. श्री. रविशंकर, भारताचे दिवंगत राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर यांसारख्या विभूतींच्या पदस्पर्शाने ‘सुयश’ची भूमी पावन झाली आहे. खेळ, चित्रकला, बागकाम, विणकाम, पाककला, गो-सेवा, स्वच्छता, स्वयंशिस्त व स्वावलंबनाचे धडे देणारे सुयश गुरूकुल हे आजच्या काळातील आध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालणारे एक संस्कार केंद्र आहे.
या रौप्य महोत्सवात पदार्पण करताना विविध कार्यक्रमांची रेलचेल यावर्षी असणार आहे. याचाच एका भाग म्हणून सुयश गुरूकुल व हब लर्निंग (Hub of Learning) आयोजित ‘युवा स्फूर्ती शिबीर’मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात सुयश गुरुकुलसह सोलापूरमधील इतर शाळेतील असे ४५० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या पत्रकार परिषदेस सुयश गुरुकुलचे संस्थापक केशव शिंदे, सुयश विद्यालयाचे मुख्याध्यापक मार्तंड कुलकर्णी, सुयश गुरुकुलाच्या मुख्याध्यापिका श्रद्धा लकडे,डॉ. निखिल तोष्णीवाल, ज्ञानेश्वर प्रतिष्ठानच्या विश्वस्त वृषाली शिंदे-महंत उपस्थित होते.