राष्ट्र उभारणीत नव मतदारांची भुमिका महत्वाची : अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : भारत हा देश लोकशाहीप्रणालीचा आदर करणारा देश म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो. लोकशाही प्रणालीमध्ये प्रत्येक नागरीकाला आपले अधिकार आहेत. आपल्या लोकशाहीप्रणालीमध्ये मतदानास अनन्य साधारण महत्त्व आहे. निवडणूकीच्या माध्यमातून आपला व आपल्या परिसराचा विकास साधण्यासाठी उमेदवाराला आपण मतदानाच्या प्रक्रियेतून निवडून देतो. आपण कुठलीही जात धर्म समोर न ठेवता राष्ट्र उभारणीसाठी नव मतदार लोकशाहीमध्ये उत्फूर्तपणे सहभागी झाला पाहिजे. इतरांनाही मतदान करण्यास प्रवृत्त केले पाहिजे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. २५ जानेवारी राज्यासह देशभरामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यावतीने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, प्रांताधिकारी निलेश पाटील, नायब तहसिलदार प्रवीण घम, महसूलचे अधिकारी, कर्मचारी संगमेश्वर महाविद्यालय व दयानंद कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
नव तरूण मतदारांनी आपल्याला नागरिक म्हणून तुमचा धर्म आणि जात सांगून सक्षम राज्य व देश घडविण्याचे काम करावे व तरूणांच्या मनातील नकारात्मक विचार बाजूला करण्यासाठी आपला तरूण वर्ग लोकशाहीमध्ये उत्फूर्तपणे सहभागी झाला पाहिजे, म्हणून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो, असे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांनी सांगितले.
लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची जबाबदारी ही नवतरूणांची असून जास्तीत जास्त तरुणांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंद करून घ्यावे व देश घडविण्याचे महान काम करून मतदान प्रक्रियेत सहभाग हा मुख्य उद्देश असल्याचे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नव तरूण मतदारांना राष्ट्रीय मतदान दिनाची शपथ घेतली. नव मतदारांना प्रमाणपत्र देण्यात आली.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक तहसिलदार निलेश पाटील, आभार प्रदर्शन उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केले.