आपत्ती व्यवस्थापनात महिलांचा नवा आत्मविश्वास
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : आपत्तीजन्य परिस्थितीत अडकलेल्या महिलांच्या बचावासाठी आता सोलापूर जिल्ह्यात महिला रेस्क्यू टीम (women rescue team) सज्ज झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेली ही टीम महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम ठरली असून, महिलांच्या सहभागामुळे बचाव कार्य अधिक प्रभावी आणि समावेशक होणार आहे.
महिलांच्या बचावासाठी महिलाच पुढे :
पंढरपूरच्या एकादशीच्या काळात वारकरी महिलांचे नदीत वाहून जाण्याचे प्रकार वारंवार घडतात. अशावेळी बचाव कार्यात पुरुषांना मर्यादा येतात. ही गरज ओळखून जिल्हा प्रशासनाने महिलांची स्वतंत्र रेस्क्यू टीम तयार करण्याचा निर्णय घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

सामाजिक संस्था, आशा वर्कर, युवतींचा उत्स्फूर्त सहभाग :
रेखा राठोड, उर्मिला पवार, अरुणा राठोड, रूपाली दोरकर, दुर्गा बनसोडे, जयश्री भिसे, शुभांगी गवते, नागोबाई बिराजदार, चैताली सावंत, लावण्या गुंडला, सोनिया चौगुले, राजश्री दोरनहळ्ळी, आसमा शेख, पूजा जगताप, सुवर्णी गायकवाड या महिलांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदवला आहे.
बारा दिवसीय प्रशिक्षणात जीवनरक्षक कौशल्यांचा समावेश (Incorporating lifesaving skills): महिला रेस्क्यू टीमला इंडियन रेस्क्यू अकॅडमीच्या प्रशिक्षकांकडून सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये आपत्तीची ओळख, CPR, स्ट्रेचर तयार करणे, प्राथमिक उपचार, बोट हाताळणी, दोरीचा वापर, गर्दी नियंत्रण (crowd control), प्रशासनाशी समन्वय अशा अनेक बाबींचा समावेश आहे.
प्रशिक्षण विजयपूर रोडवरील महाराष्ट्र एज्युकेशन हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात (Maharashtra Education Hotel Management College) तर प्रात्यक्षिके (Demonstrations) हिप्परगा तलाव येथे घेतली जात आहेत.
प्रशिक्षणार्थींचे अनुभव : भीतीवर मात, आत्मविश्वासात वाढ :
- – “लहानपणापासून पाण्याची भीती होती, पण आता मी पोहू शकते.” : रेखा राठोड
- – “पाणी बघितलं तरी अंगावर शहारा यायचा, आता ती भीती गेली.” :रूपाली दोरकर
- – “मी स्वतःचा आणि दुसऱ्यांचा जीव वाचवू शकते.” :दुर्गा बनसोडे
- – “घटना घडली तर मी एखाद्याचा जीव वाचवू शकेन.”: अरुणा राठोड
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र आणि सुरक्षा कीट : प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या आपदा सखीना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रमाणपत्र आणि सुरक्षा कीट देण्यात येणार आहे.

महिला रेस्क्यू टीमची गरज आणि अभिमान : बचाव कार्यात प्रशिक्षित व्यक्तींची गरज असते. महिलांचे बचाव करताना महिलाच पुढे आल्या तर कार्य अधिक प्रभावी होते. सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही गरज ओळखून महिला रेस्क्यू टीम तयार केली आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
-
शक्तीसागर ढोले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सोलापूर

