जिल्हाधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात
वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : बाह्य व्यक्तिमत्त्वापेक्षा आंतरिक व्यक्तिमत्त्वाचा विकास अधिक महत्त्वाचा असतो बाह्य व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी अन्नाची गरज असते, तर आंतरिक व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी मनावर संस्कार करावे लागतात. मनाची मशागत करावी लागते त्यासाठी माणसाने ग्रंथाची साथ ठेवली तर अज्ञानाच्या रात्री उजळून निघतील, असे प्रतिपादन मुख्य व्याख्याते, मराठी भाषा तज्ञ, साहित्यिक प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये व्याख्यानाचा व शहरातील सार्वजनिक वाचनालय ग्रंथपालांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी डॉ. शिवाजीराव देशमुख बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हीआयपी सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार होते. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयो तथा सदस्य सचिव मराठी भाषा अधिकारी अंजली मरोड , मुख्य व्याख्याते साहित्यिक प्रा. डॉ. शिवाजीराव मारुती देशमुख, ग्रंथ मित्र कुंडलिक मोरे, निवासी तहसीलदार श्रीकांत पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी याप्रसंगी देशमुख आपल्या शैलीत व्यक्त होताना माणसाला समाजाची ज्ञानाची गरज भागवण्यासाठी वाचन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यक्तीला वाचनाची सवय जडली पाहिजे, जगात ज्ञानाची व ज्ञानवंत माणसांची पूजा केली जाते. ज्ञानावरूनच माणसाची समाजाची, देशाची उंची मोजली जाते.प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान मिळवण्यासाठी व्यक्तीने भरपूर वाचन केले पाहिजे, वाचन ही माणसाची बौद्धिक व मानसिक गरज आहे. आजचे युग हे ज्ञानाचे तंत्रज्ञानाचे माहितीचे विकासाचे संगणकाचे आणि प्रगतीचे आहे, अशा युगात व्यक्तीच्या मनावर संस्कार होणे हे अत्यंत गरजेचे आहे.
आज वाचन संस्कृती पासून समाज दूर जातो की काय अशी शंका घेतली जाते म्हणून वाचन संस्कृती रुजवणे, वाढवणे व विकसित करणे, नवनव्या ज्ञानाची शोध घेणारे वृत्ती जोपासणे आवश्यक आहे, म्हणून माणसांनी ग्रंथाची साथ ठेवली तर अज्ञानाच्या रात्री उजळून निघतात याकरीता वाचकांनी ग्रंथाची मैत्री केली पाहिजे ती टिकवली पाहिजे. वाचनाने विचाराने वर्तनावर नियंत्रण ठेवता येते. म्हणून उत्तम वाचनाचा माणूस जगात कोठेही सुखी राहू शकतो, असे विचार प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी व्यक्त केले.
ग्रंथालय चळवळीतील ज्येष्ठ ग्रंथ मित्र कुंडलिक मोरे यांनी ग्रंथपाल हा वाचनाची गोडी निर्माण करणारा व वाचन चळवळ वृद्धिगत करणारा अत्यंत जबाबदार व्यक्ती असून तो आजही दुर्लक्षित असल्याचे जाणून दिले.अध्यक्षीय भाषणात निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार म्हणाले, वाचनाने माणसाचे अज्ञान दूर होते तर माणसाला प्रगतीपथावर घेऊन जाते आजचे व्याख्यान हे निश्चित आपल्या सर्वांना विचार करायला लावणारे असून या व्याख्यानातून निश्चितच चांगला संदेश मिळाला आहे.
याप्रसंगी अंजली मरोड व मान्यवरांच्या हस्ते शहरांमधील सर्व ग्रंथपालांचा ग्रंथ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, आभारप्रदर्शन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य पद्माकर कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे प्रा. डॉ. शिवाजीराव शिंदे, सहाय्यक कुलसचिव प्रा. सुहास पुजारी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे, शहरातील सर्व ग्रंथपाल वर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रंथालय अधिकारी कार्यालयमधील कर्मचारी उपस्थित होते.