एक तेलुगू भाषिक या नात्याने मला सोलापूरचा अभिमान
तेलंगणाचे प्रसिद्ध उद्योजक सिद्धरेड्डी कंदगटला यांची ग्वाही
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : आपल्या देशात आजदेखील शिक्षण क्षेत्रात विदारक अवस्था दिसून येते. हे हे लक्षात घेऊन माझ्यापरीने शैक्षणिक गरजापूर्तीसाठी मदत करण्याचे काम हाती घेतले आहे. केवळ तेलंगाणा, महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध देशात हे काम करण्याचा प्रयत्न करणार, अशी ग्वाही तेलंगाणामधील प्रख्यात उद्योजक व समाजसेवक सिद्धरेड्डी कंदगटला यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मोहोळ येथील वैष्णवी इंग्लिश मॉडेल स्कूलला शैक्षणिक साहित्य भेट देण्यासाठी सिद्धरेड्डी कंदगटला हे शुक्रवारी सोलापुरात आले होते. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
================================================================================
सिद्धरेड्डी कंदगटला म्हणाले की, गोरगरीब लोक शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून मी काही वर्षांपासून शैक्षणिक गरजा पुर्तीचे काम करीत आहे. या अंतर्गत हैदराबाद येथे एक कोटी खर्च करून शाळा बांधून दिली. आदिवासी भागात दोन शाळा बांधून दिल्या. आता आणखी तीन शाळांचे काम सुरू आहे. शैक्षणिक क्षेत्रातील दूरवस्था पाहावत नसल्याने मी शैक्षणिक मदतीचे कार्य करण्याचे काम हाती घेतले आहे. सोलापुरात सुमारे पाच लाख तेलुगू बांधव राहतात, या लोकांच्या येथे शैक्षणिक संस्था आहेत, हे ऐकून एक तेलुगू भाषिक या नात्याने मला अभिमान वाटला. सोलापुरातील तेलुगू भाषिकांसह कुअन्य कोणत्याही समाज बांधवांसाठी मी शैक्षणिक मदत करण्यास इच्छुक आहे. केवळ तेलंगाणा महाराष्ट्रच नव्हे तर सबंध देशात हे काम मला करावयाचे आहे. शिक्षणाने माणसाची प्रगती होते, यावर माझा ठाम विश्वास असल्याने वंचित घटकांचा शैक्षणिक उद्धार झाल्यास त्यांची भविष्यात चांगली प्रगती होईल, अशी मला आशा आहे, असे सिद्धरेड्डी कंदगटला म्हणाले. या पत्रकार परिषदेत तेलुगू अभिनेता इंद्रसेना बुद्धम, विशाल काळे, विपुल मिरजकर आदी उपस्थित होते.
================================================================================
सोलापूरसाठी प्रवासी विमानसेवा गरजेची
सोलापूरमधील टेक्स्टाईल उद्योगाबाबत मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. येथील टॉवेलची, कृषी मालाची निर्यात होते. टेक्सटाईल, शेती उद्योगासह अन्य उद्योगांच्या विकासासाठी सोलापुरात प्रवासी विमान सेवा असणे गरजेचे आहे असे मतही सिद्धूरेड्डी कंदगटला यांनी व्यक्त केले.