खासदार डॉ. अजित गोपछडे यांचे प्रतिपादन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : वीरशैव लिंगायत समाजात जवळपास ५७ पोट जाती आहेत. १२-१३ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास दीड कोटी लिंगायत समाज आहे. १६ जिल्ह्यांमध्ये स्पर्श करणारी लिंगायत समाजाची संख्या आहे. राजकीयदृष्ट्या विचार करता ५७ मतदार संघामध्ये लिंगायत समाज हा प्रभावशाली ठरणारा असा समाज आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्यादेखील लिंगायत समाजाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केले. ते वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेनिमित सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आपण सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धारामेश्वारांचे दर्शन त्यांचे आशीर्वाद घेऊन आपणाशी संवाद साधण्यासाठी आलोय, असे सांगत वीरशैव लिंगायत समाजाची राजकीय इच्छाशक्तीदेखील प्रबळ करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार डॉ. अजित गोपछडे पुढे म्हणाले, राजकीय क्षेत्रात जर एखादा समाजाचा नेता पुढे सरसावला तर आपोआपच अन्य क्षेत्रातील अर्थात आरोग्य, कृषी, वैद्यकीय यासह समाजातील इतर क्षेत्रातील समस्या आपोआपच सोडविल्या जाऊ शकतात. दरम्यान, वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा म्हणजे सामाजिक स्वरुपाची आहे. त्याला राजकीय स्वरूप अजिबात दिलेले नाही, असेही ते म्हणाले. कृषी, शैक्षणिक, विझान, सामाजिक,राजकीय अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचे प्रबोधन करणे, मदत करणे, राज्यसभा खासदार म्हणून जनतेपर्यंत जाणं यादृष्टीकोनातून ही वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा काढली जात आहे.
वीरशैव लिंगायत समाजातील इंजिनीअर, डॉक्टर अशा उच्च शिक्षणाची आशा बाळगणाऱ्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविणे, त्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर सारख्या शहरात जे वसतिगृह लागतात त्यासाठी त्यांना मोफत राहण्याची, जेवणाची सोय करणे आणि त्यांच्या शिष्यवृत्तीची सोय करणे हाही या वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचे प्रमुख उद्देश्य आहे. सरकारच्या ज्या विविध योजना आहेत त्या गोरगरीबांपर्यंत पोहोचत नाहीत. कृषी, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील अश्या विविध योजना या समाजातील तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या पत्रकार परिषदेस वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचे संयोजक, देवगिरी-मराठवाडा प्रांताचे प्रमुख नितीन शेटे, पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक यादवाडे, यात्रेचे मार्गदर्शक प्रा. गजानन धरणे, आरोग्य विषयक क्षेत्राचे समन्वयक डॉ. राजेश फडकुले, डॉ. सचिन बोंगरगे आदी उपस्थित होते.
======================================================================
वीरशैव लिंगायत समाजाला ओबीसी आरक्षण देण्यात यावी
वीरशैव लिंगायत समाजात जवळपास ५७ पोट जाती आहेत. या संपूर्ण पोटजातींना सरसकट ओबीसी आरक्षण देण्यात यावी, अशी मागणी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केली आहे.