
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात
स्वातंत्र्यदिनी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या हस्ते वृक्षारोपण
by kanya news||
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यंदाच्या वर्षी “एक लाख वृक्ष लागवड” करण्याचा संकल्प केला असून, या उपक्रमाचा शुभारंभ देशाच्या स्वातंत्र्यदिनी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आला.ध्वजारोहणानंतर विद्यापीठाच्या ४८२ एकर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी डॉ. विकास घुटे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांच्यासह अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी परिवर्तन सामाजिक संस्थेच्या अमृता अकलूजकर व त्यांची टीम देखील उपस्थित होती. यावेळी विद्यापीठ कॅम्पसमध्ये शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अभियांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले.
==============================================================================
विविध सामाजिक संस्थांचा पुढाकार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात वृक्षारोपण करण्यासाठी पुणे येथील हरित मित्र परिवाराचे डॉ. महेंद्र घागरे यांनी स्वीट महूगुणीचे ५००० व केशर आंब्याचे २००० वृक्ष, रोपे मोफत दिली आहेत. परिवर्तन सामाजिक संस्थेच्या अमृता अकलूजकर यांनी स्वीट महूगुणीचे दोन हजार रोपे दिली आहेत. मोहोळ येथील बोडके नर्सरीचे शिवाजी बोडके यांनी केशर आंब्याचे १५१ रोपे मोफत दिली आहेत. भारत विकास परिषदेचे महादेव न्हावकर यांनी १०० वनऔषधी रोपे तर विद्यापीठातील सहायक कुलसचिव आनंद पवार यांनी ५५ स्वीट महगुणीचे रोपे विद्यापीठास मोफत दिली आहेत. याचबरोबर विद्यापीठाच्या नर्सरीमध्ये ६० हजार बांबुची रोपे तयार आहेत. करंज, पेरू, सिताफळ, लिंब, वड, पिंपळ, जांभूळ आदी फळांच्या वृक्षांचीदेखील लागवड विद्यापीठात होणार आहे.