डॉ. पल्लवी गुहा: सोलापूर विद्यापीठात तृतीयपंथीयांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : तृतीयपंथीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून अपेक्षित प्रयत्न होताना दिसून येत आहे. समाज माध्यमातून तृतीयपंथीयांविषयी सकारात्मक जनजागृती आवश्यक आहे. सामान्य नागरिकांनी देखील तृतीयपंथीयांना चांगली वागणूक द्यावी, त्यांना स्वीकारावे आणि त्यांना आपल्यात सामावून घ्यावे, असे आवाहन तोसवान विद्यापीठ, अमेरिका येथील तज्ञ डॉ. पल्लवी गुहा यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुल आणि समाजसेवक ब्रिजमोहन फोफलीया यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय तृतीयपंथीयांची आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. पल्लवी गुहा यांच्या हस्ते ऑनलाइन माध्यमाद्वारे झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ११० संशोधक, विद्यार्थी शोधनिबंध सादर केले आहेत. एकूण २५० जणांचा यामध्ये सहभाग आहे.
अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया, डॉ. सान्वी जेठवाणी, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत आदी उपस्थित होते.
डॉ. पल्लवी गुहा यांनी सरकार, संशोधक व अभ्यासक तृतीयपंथीयांचे जीवनमान बदलू शकतात. तसे प्रयत्न होताना दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने तृतीयपंथीयांच्या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले, ही खूप कौतुकाची गोष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, तृतीयपंथीयांचे जीवन, त्यांची प्रगती, आरोग्य आणि त्यांच्या समस्या याबाबत चर्चा व मंथन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले. पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक घटकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतलेला आहे. त्यांना प्राथमिक ते पदवी व संशोधनापर्यंत शिक्षण मिळण्यासाठी देखील विद्यापीठाने पुढाकार घेणार आहे. याविषयी तृतीयपंथीयांसाठी सुविधा केंद्र निर्माण करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देखील दाखल केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दि. २१ मार्च २०२५ रोजी सोलापुरात रॅली, सांस्कृतिक कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक व स्वागत कौशल्य विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ. अंबादास भासके यांनी करून दिला.सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे, आभार प्रदर्शन प्रा. तारीक तांबोळी यांनी केले. फोफलिया यांनी समाजात काम करताना तृतीयपंथीयांविषयी काही केले नव्हते. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पुढाकाराने तृतीयपथीयांसाठी एक वेगळे कार्य हाती घेतल्याचे समाधान असल्याचे सांगितले. या परिषदेत डॉ. सानवी जेठवाणी, सचिन वायकुळे, तृतीयपंथी पहिले सरपंच ज्ञानेश्वर कांबळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.