
पर्यावरण, शिक्षण, पाणी नियोजन, कौशल्य विकासावर होणार काम
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने दत्तक गाव योजनेंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी आणि माढा तालुक्यातील केवड ही दोन गावे दत्तक घेतली आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दोन्ही गावच्या प्रतिनिधींना निवडीचे पत्र दिले.
या माध्यमातून पर्यावरण, शिक्षण, पर्यटन, महिला सबलीकरण, पाणी नियोजन, कौशल्य विकास अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून गावाचा विकास साधला जाणार आहे. सन २०२४-२५ पासून पुढील तीन वर्षे ही दोन गावे विद्यापीठाने दत्तक घेतलेली असून, अशा आशयाचे पत्र दोन्ही गावच्या ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे.
यावेळी प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख डॉ. राजेंद्र वडजे, डॉ.श्रीकांत अंधारे, डॉ.अभिजीत जगताप, कक्ष अधिकारी विजय पाटील, सागर धर्मे आदी उपस्थित होते. इंगळगी ग्रामपंचायतीच्यावतीने राहुल वंजारे यांनी तर केवडतर्फे सरपंच प्रतिनिधी राजेंद्र पाटील, उपसरपंच प्रतिनिधी नितीन पाडुळे, ग्रामपंचायत सदस्य भारत लटके, निलेश लटके, पोपट घुले, विशाल लटके यांनी पत्र स्वीकारले.