ठिबिक लघुपटात “पाण्याचे महत्व” यावर फोकस
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सुरछाया फिल्म सेंटर प्रस्तुत ठिबिक या लघुपटाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे आतापर्यत २० पुरस्कार मिळाले आहेत, अशी माहिती लेखक दिग्दर्शक प्रशांत निकंबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या लघुपटामध्ये आपल्याकडून चुकून आणि जाणून-बुजून पाण्याचे किती नुकसान होते आणि ज्यावेळेस खरंच आपल्याला पाण्याची गरज असते, त्यावेळेस पाण्याचे आपल्याला महत्व कळते हे या लघुपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
या लघू चित्रपटाला सेंटऍगो साऊथ अमेरिका, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये बेस्ट शॉर्ट फिल्म, बेस्ट ऍक्टर, बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर आणि बेस्ट सिनेमोटोग्राफर असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ९ पुरस्कार मिळाले आहेत. पश्चिम बंगाल, राजस्थान या राज्यातील वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट मेकअप आर्टिस्ट, बेस्ट शॉर्ट फिल्म असे राष्ट्रीय दर्जाचे ३ पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच मुंबई, छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा, उदगीर या ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये ८ राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.
या लघुपटाचे लेखन-दिग्दर्शन प्रशांत निकंबे यांनी केले असून, छायांकन विनोद बोडके यांनी केले आहे. संकलन परवेज इनामदार, रंगभूषा वनिता मुंडे यांनी केले आहे. या लघुपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रशांत निकंबे आणि सहाय्यक भूमिकेत सागर गायकवाड व गणेश शिवपुजे हे कलाकार आहेत. या लघुपटाची निर्मिती सूरछाया फिल्म सेंटर अंतर्गत विनोद बोडके आणि प्रशांत निकंबे यांनी केलेली आहे.
या पत्रकार परिषदेस प्रशांत निकंबे, सागर गायकवाड (सहाय्यक कलाकार), विनोद बोडके (छायांकन) वनिता मुंडे (रंगभूषा), परवेझ इनामदार (संकलन) आदी उपस्थित होते.