मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे आवाहन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : कुष्ठरुग्ण शोध, स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभाविपणे राबवा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम- कुष्ठरुग्ण शोध व उपचार अभियान- दि. ३१ जानेवारी ते दि. १५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान सोलापूर जिल्ह्यात सदर कुष्ठरूग्ण शोध व उपचार अभियान राबविण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकार अधिकारी कुलदिप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची सभा सदर अभियान सोलापूर जिल्ह्यात राबविण्यासाठी घेण्यात आली. त्यावेळी कुलदीप जंगम बोलत होते.
समाजातील निदान न झालेले कुष्ठरूग्ण लवकरात लवकर शोधून त्वरीत बहुविध औषधोपचारखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करून होणार प्रसार कमी करणे, समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे, सन २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणे.
यासाठी समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरूगणांचा शोध पथकामार्फत शोध घेऊन त्याचे निदान निश्चित करणे व निदान झालेल्या कुष्ठरुग्णांना तात्काळ बहुविध औषधोपचार सुरू करण्यासाठी केंद्र कुष्ठरोग अभियान सुरू केले आहे. हे अभियान १४ दिवसांचे असणार आहे.
- या अभियानात राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्हृयाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील सर्व व शहरी भागातील निवडक लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार आहे. विविध माध्यमांद्वारे कुष्ठरोगाविषयी शास्त्रीय माहिती समाजात पसरविण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील या १४ दिवसांच्या तपासणी अभियानासाठी ३६ लाख ५७ हजार ५९० लोकसंख्येची निवड करण्यात आली आहे. २ हजार ७६८ शोधपथके तयार करण्यात आली आहेत. या शोध पथकांचे पर्यवेक्षण करण्यासाठी ५५४ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शोध पथकाने शोधलेल्या प्रत्येक संशयीताची वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून करुन निदान करण्यात येणार आहे. जर कुष्ठरोग असेल तर तात्काळ बहुविध औषधोपचार सुरु करण्यात येणार आहे.
सदर अभियान दरम्यान तपासणी करण्यासाठी येणाऱ्या पथकाकडून तपासणी करुन घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले. यावेळी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), सोलापूर डॉ. मोहन शेगर, यांनी सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. या सभेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, आरोग्य अधिकारी, डॉ. राखी माने, डॉ. नंदकिशोर घाडगे, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. मिनाक्षी बनसोडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. आनंद गोडसे, वैद्यकीय अधिकारी कुष्ठरोग विभाग, डॉ. एस.पी. कुलकर्णी, निवासी वैद्यकीय अधिकारी, उमेश साने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, वैशाली थोरात, जिल्हा लेखा व्यवस्थापक, वंदना शिंदे, जिल्हा आशा समन्वयक यांच्यासह आरोग्य सेवेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कुष्ठरोगाची लक्षणे-
• त्वचेवर फिकट/ लालसर बधिर चट्टा असणे
• चट्टयावरील त्वचा जाड होणे
• चेहऱ्याची चकाकणारी अथवा तेलकट त्वचा
• त्वचेवर गाठी येणे
• कानाच्या पाळ्या जाड होणे / कानाच्या पाळ्यावर गाठी येणे / चेहऱ्यावर गाठी येणे
• डोळे पुर्ण बंद करता न येणे / डोळ्यातून पाणी येणे
• डोळ्यांच्या भुवयाचे केस विरळ होणे
• बसके नाक
• हाता / पायाच्या मज्जा (नसा) जाडसर होणे
• कोपरे, गुडघे किंवा घोट्याजवळ मुंग्या येणे
• त्वचेवर थंड किंवा गरम संवेदना न जाणवणे
• तळहातावर संवेदना न जाणवणे
• संवेदनारहित हात / पाय
• तळहातावरील वेदनारहित जखमा
• हातामध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे
• शर्टचे बटण लावता न येणे
• हातापायांच्या बोटांना मुंग्या येणे
• हाता पायांना मुंग्या येणे
• पायावरील वेदनारहीत जखमा
• हातापायाची बोटे वाकडी होणे
• पायांच्या तळव्यांना बधिरता येणे
• पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, चालताना चप्पल गळून पडणे
• पाय घोट्यापासून लुळा पडणे, चालताना पाय फरफटत चालणे.