राष्ट्रीय युवा दिनानिमित युवा संवाद,रक्तदान शिबिरास प्रतिसाद
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : स्वामी विवेकानंदांनी तरुणांच्या हृदयाला जवळून स्पर्श केला होता. त्यांनी आपल्या देशवासीयांचे जीवन समृद्ध करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवले होते. स्वामी विवेकानंद हे तरुणांचे प्रेरणास्थान आणि काही करण्याची इच्छा हृदयात जागृत करणारे नेते आहेत. यासोबतच त्यांची एक सखोल विचारवंत, आध्यात्मिक गुरू आणि संत म्हणूनही ओळख आहे. विवेकानंद यांचे अनमोल विचार आजही तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत, असे प्रतिपादन सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी केले. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर व विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिनानिमित युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी दि. १२ जानेवारी स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिनी साजरा केला जातो. हा दिवस तरुणांची क्षमता आणि त्यांची ऊर्जा देशाच्या प्रगतीत योगदान म्हणून साजरा करतो. यावेळी नगर प्रमुख रवी कंटली, उद्योजक पेंटप्पा गड्डम, विभागीय प्रांत प्रमुख विकास कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
- स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून रेल्वे लाईन्स शाखेच्यावतीने श्री हनुमान मंदिर पटांगण, माधवनगर येथे मदगोंडा पुजारी, श्रुतिक दासरी यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसाठी सामूहिक सूर्यनमस्काराचा अभ्यास घेण्यात आला.
- युवकांसाठी आयोजित रक्तदान शिबिरात १५ युवा-युवतींनी रक्तदान केले. वैद्यकीय आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे यांच्या हस्ते स्वामीजींच्या योग व अन्य विषयवरील पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सदर प्रदर्शन दि. १२ ते १६ जानेवारीपर्यंत दररोज संध्याकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
- राष्ट्रीय युवा दिनानिमित कार्यक्रमात दिलेल्या व्याख्यानवर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली. प्रश्नमंजुषा स्पर्धेत संस्कार भस्मे, राहुल दिंडोरे, ऐश्वर्या राजमाने, गजानन परळकर आणि शंकर पेद्दी हे विजेते ठरले.
कार्यक्रमाची सुरुवात केंद्राच्या सहना ववतू प्रार्थनेने करण्यात आली. सूत्रसंचालन भक्ती कदम, आभार प्रदर्शन विकास कुलकर्णी यांनी केले.
यासाठी अमेय साखरे, केंद्रीय संचार ब्युरोचे कार्यालय सहायक जे. एम. हन्नुरे आणि रक्त संकलनासाठी श्रीमती गोपाबाई दमाणी ब्लड सेंटर, सोलापूर यांचे जनसंपर्क अधिकारी अमरजा थिटे, तंत्रज्ञ हर्षदा घाटे, पल्लवी धावडे, परिचारिका रेखा रणसिंग, शिपाई सुनिल कदम यांनी परिश्रम घेतले.