सन २०२४-२५ या चालू शैक्षणिक वर्षापासून ग्रेस गुण झाले “ऑनलाईन” : तालुका क्रीडाधिकारी गणेश पवार यांची माहिती
By Kanya News
सोलापूर : येत्या दि. १९ जुलैपासून जिल्हास्तरीय सुब्रतो फुटबॉल स्पर्धा तर शहरस्तरीय सुब्रतो स्पर्धा दि. २२ पासून सुरु होणार आहेत, अशी माहिती तालुका क्रीडाधिकारी गणेश पवार यांनी दिली. शहरस्तरीय शालेय स्पर्धा सन २०२४-२५ या चालू शैक्षणिक वर्षासाठी क्रीडा स्पर्धाचे आयोजन व नियोजन यासाठी क्रीडाशिक्षकांची सभा झाली. त्यावेळी गणेश पवार बोलत होते. तालुका क्रीडाधिकारी गणेश पवार म्हणाले, सन २०२४-२५ या वर्षापासून ग्रेस गुण ऑनलाइन करण्यात आले आहेत. याप्रसंगी काही क्रीडाशिक्षकानी विचार व्यक्त केले.
————————————–
शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष खेंडे म्हणाले, शालेय क्रीडा स्पर्धा घेत असताना एका दिवशी एकच स्पर्धा घेण्यात यावी. स्पर्धेचे ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी नेमावेत. महापालिकेच्या क्रीडा स्पर्धेचे महापालिकेच्या क्रीडांगणावरच आयोजन करावेत. शिवाय पंचांच्या मानधनात वाढ करावे, अशी मागणीही संतोष खेंडे यांनी केली.
शारीरिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व क्रीडाशिक्षक दशरथ गुरव म्हणाले, शालेय क्रीडा स्पर्धा वेळेवर सुरू करावेत. स्पर्धेच्या एक दिवसाअगोदर सर्व मैदानाची आखणी व्हायला पाहिजे. सर्व साहित्य उपलब्ध करून द्यावेत.
क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे म्हणाले, स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंना वाशरूमची सोय व पाण्याची सोय देखील करण्यात यावी. स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना मेडल देऊन गौरविण्यात यावे. तसेच स्पर्धेचे शुल्क खेळाडूंना मोफत करावेत. यावेळी अनेक क्रीडा शिक्षकांनी आपल्या मागण्या मांडल्या. याप्रसंगी शहरातील एकूण 250 क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
शहरस्तरीय शालेय स्पर्धा सन २०२४-२५ या चालू शैक्षणिक वर्षासाठी क्रीडा स्पर्धाचे आयोजन व नियोजन यासाठी क्रीडाशिक्षकांची सभा झाली. त्यावेळी उपस्थित क्रीडा शिक्षक.