जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे पोर्टलच उघडत नाही; अनेक क्रीडा शिक्षकांची तक्रार
शालेय क्रीडा स्पर्धेच्या प्राथमिक अर्ज प्रक्रियेला सुरुवात, मात्र पोर्टलच बंद, अर्ज कसे दाखल करणार?
By Kanya News
सोलापूर: सन २०२४-२५ या चालू शैक्षणिक वर्षाकरिता शहरस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या प्राथमिक अर्ज करण्याच्या प्रक्रियेला मंगळवार, दि. १५ जुलैपासून सुरुवात झाली खरी. मात्र तीन-चार दिवस झाले, प्राथमिक अर्ज दिसत नाही. त्यामुळे क्रीडा शिक्षकानी तक्रार केली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेले जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे वेब पोर्टलच (सांकेतिक स्थळ) उघडत नसल्याची तक्रारदेखील अनेक क्रीडा शिक्षकानी कन्या न्यूजशी बोलताना केली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर विभाग (डीएसओ सोलापूर डिवीजन) असे त्या अर्ज दाखल करण्यासाठीचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अधिकृत वेबसाईट/वेबपोर्टल आहे. सोलापूर शहर व जिल्यातील सर्व शाळा-महाविद्यालये, मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक यांना सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या या अधिकृत वेबसाईटवर (dsosolapur१@gmail.com) या संकेतस्थळावर खेळाडू व संघाची नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे पत्रकान्वये कळविण्यात आले आहे. सदर स्पर्धेच्या प्रवेशिका (ऑनलाईन) माध्यमातून बुधवार, दि. १७ जुलैपर्यंत नोंदवण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आवाहन करण्यात आले होते. मात्र बुधवारी काही क्रीडा शिक्षकानी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ सुरु होत नसल्याची, ओपन होत नसल्याची तक्रार कन्या न्यूजशी केली आहे.
कदाचित एकाचवेळी सर्वजण शालेय क्रीडा स्पर्धेच्या प्राथमिक अर्ज दाखल करीत असल्याने सर्वर डाऊन झाले असावे, असे काही क्रीडा शिक्षकांचे मत समोर आले आहे. खरी वास्तविकता काय आहे? वस्तुस्थिती काय असेल? याची माहिती जिल्हा क्रीडाधीकारीच देऊ शकतील. काहीना सदरचे संकेतस्थळ ओपनही झाले असावे, तर सर्व्हर डाऊनमुळे काहींना अडचणी आल्या असाव्यात.