
पीएम सूर्यघर योजनेचा लाभ प्रत्येकाने घ्यावा: एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका निता केळकर यांचे आवाहन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : जानेवारी २०२५- प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी असून, या योजनेकरिता राष्ट्रीयकृत बँकांही अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत आहेत. छोट्या-मोठ्या सर्वच ग्राहकांनी याचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका निता केळकर यांनी सोलापूर येथे केले.
सोलापूर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० व प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचे मोठे काम महावितरणतर्फे सुरु आहे. या प्रमुख योजनांसह महावितरणतर्फे सुरु असलेल्या सर्वच कामांचा आढावा घेण्यासाठी निता केळकर यांनी सोलापूर येथे आढावा बैठक घेतली. अधीक्षक अभियंता यांच्या दालनात झालेल्या बैठकीत निता केळकर यांनी ग्राहक संघटना व उद्योजकांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्यावर अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. धोरणात्मक प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन ग्राहक प्रतिनिधींना दिले.
निता केळकर म्हणाल्या…
- शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर प्रकल्पांना वेग दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात ८६७ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे काम सुरु आहे.
- मागेल त्या शेतकऱ्यांना ९० ते ९५ टक्के अनुदानातून सौरपंप दिले जात आहेत. घरगुती ग्राहकांसाठी सूर्यघर योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. सूर्यघर योजना घरगुती ग्राहकांना विजेच्या दृष्टीने स्वावलंबी करणारी आहे.
- सूर्यघर योजनेसाठी १ किलोवॅटला ३० हजार, २ किलोवॅटला ६० हजार तर ३ किलोवॅट किंवा त्यापुढील प्रकल्पासाठी ८७ हजार रुपयांचे अनुदान मिळते.
- या योजनेला अनेक राष्ट्रीयकृत बँकाही अल्प व्याजदराने कर्जपुरवठा केला जातो. सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून, एजन्सी निवडण्याचे स्वातंत्र्यही ग्राहकालाच असल्याचे निता केळकर यांनी सांगितले.
या बैठकीस भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, ग्राहक, उद्योजक प्रतिनिधी यांच्यासह सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते, अधिकारी उपस्थित होते.