कोणत्याही सहकारी संस्थानी यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकता, स्वच्छता व शिस्तबद्धता या तीन गुणांचा अंगिकार करण्याचे आवाहन

सहकार  मंत्र्यांच्या उपस्थितीत सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ, स्मरणिकेचेही प्रकाशन

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : संपूर्ण राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात सहकार चळवळ रुजलेली आहे. किंबहुना संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याला आघाडीवर ठेवण्यात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. सोलापूर येथे आयोजित सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ व स्मरणिका प्रकाशनप्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील मार्गदर्शन करीत होते.

यावेळी भारतीय रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक सतीश मराठे, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, समारंभाचे स्वागत अध्यक्ष राजशेखर शिवदारे, बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, व्हाईस चेअरमन सुचेता थोबडे, बँकेचे सरव्यवस्थापक रामलाल शर्मा, सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड,  जिल्हा सहकारी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे  आदी उपस्थित होते.

हकार मंत्री  पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचा विकास ग्रामीण भागात रुजलेल्या सहकार चळवळीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. देशातील अन्य राज्याचा विचार केला तर त्या राज्यामध्ये सहकार चळवळ व्यवस्थितपणे रुजलेली नाही, त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात आवश्यक तेवढा विकास न झाल्यामुळे त्या राज्यातील नागरिक रोजगारासाठी महाराष्ट्र राज्यासह अन्य विकसित राज्यात स्थलांतर करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आपल्या राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना अधिक बळ देण्याचे धोरण शासनाने निश्चित केलेले असल्याचे त्यांनी सांगितले.

  • सहकारी चळवळीचे महत्त्व जाणून केंद्रीय सहकार विभागाने संपूर्ण देशभरात पुढील पाच वर्षात दहा हजार पेक्षा अधिक सहकारी संस्था स्थापित करण्याचे धोरण ठरवलेले आहे. राज्याचे सहकार विभाग ही सहकारी संस्थांमध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर करून सहकारी संस्थांच्या उन्नतीला चालना देण्यासाठी सहकार्याची भूमिका निभावणार आहे. सहकारी संस्थांनी आपली विश्वासाहर्ता टिकवण्यासाठी आरबीआय ने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कोणतीही सहकारी संस्था यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकता, स्वच्छता व शिस्तबद्धता या तीन गुणांचा अंगीकार करावा, असे आवाहनही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सुचित केले.

  • सोलापूर जिल्ह्यातील ३२ नागरी सहकारी बँकापैकी २७ बँकांची परिस्थिती चांगली असून, ही बाब सोलापूर जिल्ह्यात सहकार चळवळ व्यवस्थितपणे सुरू असल्याचे पाटील यांनी सांगून सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभास शुभेच्छा देऊन या बँकेसह सर्व सहकारी बँकांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

भारतीय रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळाचे संचालक सतीश मराठे यांनी देशभरात जवळपास चौदाशे सहकारी बँका असून त्यातील एक तृतीयांश बँका महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहेत असे सांगून सहकार चळवळीला भाग भांडवल निर्माण करण्याचा मोठा प्रश्न असल्याचे सांगून सहकार कायद्यात बदल करून बँकांना भांडवल निर्मिती करण्यासाठी शासनाने विचार करावा. टेक्नॉलॉजी फंड निर्माण करून शासनाने सहकारी संस्थांना वित्तीय सहाय्य उपलब्ध करून द्यावे त्याप्रमाणेच कर्ज वसुली प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

आमदार विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी, देवेंद्र कोठे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभ निमित्त बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रारंभी समारंभाचे स्वागत अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी बँकेच्या वाटचालीची माहिती दिली. बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी बँकेने १९७४ पासून आज रोजीपर्यंत केलेल्या व राबवलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.यावेळी बँकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact