जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद : जय शिवाजी जय भारत पदयात्रेत जय भवानी जय शिवाजी घोषणा, ढोल ताशाच्या गजराने सोलापूर नगरी दुमदुमली!

 

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती जयंतीनिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्याना पर्यंत जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत सहभागी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी- कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, पालक, पत्रकार यांनी जय भवानी जय शिवाजी या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाचा विचारधारेला पुढे नेऊन समाजात एकता आणि राष्ट्रीय ऐक्य भावना निर्माण करण्याचा संदेश दिला.

या पदयात्रेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी कुलदीप जंगम, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी विना पवार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोषकुमार देशमुख, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार श्रीकांत पाटील, तहसीलदार निलेश पाटील यांच्यासह अन्य सर्व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी व मान्यवर नागरिक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जय शिवाजी जय भारत पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला. स्वतः या पदयात्रेत सहभागी झाले. ही यात्रा नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता चौक मार्गे, रंगभवन चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत आली. या ठिकाणी सोलापूर शहरातील मुस्लिम बांधवाकडून पदयात्रेचे स्वागत पुष्पगुच्छ व पुष्पवृष्टी करून करण्यात आले.

श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड च्या वतीने महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 नियोजन भवन येथील कार्यक्रम:

छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंतीनिमित्त दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यामध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. नियोजन भवन येथील कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे अनुकरण करून समाजात एकता निर्माण करूया : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

  आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायक दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष, त्यांचे धैर्य आणि नेतृत्व कौशल्यामुळे आपण सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आपण त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करून समाजात एकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया. जय शिवाजी जय भारत या पदयात्रेच्या माध्यमातून आपण महाराजांच्या विचारधारेला उजाळा देणार आहोत. ही पदयात्रा फक्त एक भव्य उत्सव नाही तर आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

एक पेड मां के नाम :

केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे या पदयात्रा उत्सवात आईच्या नावाने एक वृक्ष (एक पेड मां के नाम) यानुसार नियोजन भवन परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते एका वृक्षाची लागवड करण्यात आली.

पदयात्रा :

जय शिवाजी जय भारत पद यात्रेला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला. त्यानंतर या यात्रेत सहभागी झालेल्या विद्यार्थी नागरिकांकडून जय भवानी जय शिवाजी यांच्या घोषणा तर ढोल ताशाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. पदयात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या अंगात विजयश्री संचारल्याप्रमाणे प्रत्येक जण घोषणा देऊन पुढे मार्गस्थ होत होता. या पदयात्रेत सहभागी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी, ढोल ताशा, लेझीमच्या गजराने एका मोठ्या उत्सावाचे वातावरण तयार केले होते.

प्रारंभी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी जय शिवाजी जय भारत पदयात्राच्या आयोजनाच्या उद्देश सांगितला. केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ जयंती महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यात पदयात्रेच्या माध्यमातून साजरी करण्याचे सुचित करण्यात आलेले होते. त्याप्रमाणे सोलापूर जिल्हा प्रशासनाने ही यात्रा आयोजित केलेली असून, यात सहभागी झालेल्या सर्व शाळांमधील विद्यार्थी पालक, मान्यवर व्यक्तींचे त्यांनी यावेळी स्वागत केले. क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचे यावेळी स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील शौर्य गीतांचे गायन झाले. शाहीर यांनी पोवाड्याच्या माध्यमातून शिवछत्रपतींचा इतिहास सर्वांसमोर मांडला. यावेळी शिवछत्रपती यांचा पाळणा कार्यक्रम झाला. शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाचे सादरीकरण झाले. त्यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेझीम खेळातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  येथे आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोशाख परिधान केलेला होता. मावळे झालेले विद्यार्थी हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व विचार यावर भाषण केले. प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दीप प्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराज यच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact