प. पू. स्वामी गोविंद देव गिरीजी यांच्या ओजस्वी वाणीतून
दि. १९ ते २५ सप्टेंबरदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज कथामाला
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : समस्त हिंदू समाजातर्फे दि. १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज कथेच्या मंडपाचे भूमिपूजन जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये करण्यात आले. यावेळी नागेश करजगी ऑर्किड स्कूलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी यांच्या हस्ते मंडपाचे आणि गोमातेचे पूजन करण्यात आले.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देव गिरीजी यांच्या ओजस्वी वाणीतून दि. १९ ते २५ सप्टेंबर दरम्यान दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ७.३० दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज कथा ऐकण्याची पर्वणी सोलापूरकरांना मिळणार आहे. याकरिता दररोज हजारो सोलापूरकर उपस्थित राहणार आहेत. कथेच्या तयारीसाठी मंडप उभारणी सुरू करण्यात आली आहे. ३० हजार चौरस फुटांच्या जागेत भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे.
या मंडपात ज्येष्ठ नागरिकांसाठी खुर्च्यांची सोय तर उर्वरित नागरिकांसाठी भारतीय बैठक असणार आहे. तसेच या ठिकाणी विविध अध्यात्मिक, सामाजिक ऐतिहासिक पुस्तकांची दुकानेही लावण्यात येणार आहेत.याप्रसंगी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे आर्थिक समितीचे प्रमुख सल्लागार राजगोपाल मिणीयार, अविनाश महागावकर, हेमंत पिंगळे, संगीता जाधव, विनोद रसाळ, सतीश सिरसिल्ला, आकाश शिरते आदी उपस्थित होते.
सोलापूरकरांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेस उपस्थित रहावे आणि लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त हिंदू समाजातर्फे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे आर्थिक समितीचे प्रमुख सल्लागार राजगोपाल मिणीयार यांनी केले आहे.