सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

BY Kanya News||
सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची” मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे पुण्यकर्म म्हणून आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. सदर बाब विचारात घेवून सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना दि.१४ जुलै २०२४ च्या शासन निर्णायानुसार राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेतून प्रति व्यक्ती ३० हजार रुपये खर्चाची कमाल मर्यादा असून यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास आदी बाबीचा समावेश असेल. भारतातील ७३ व राज्यातील ६६ निर्धारित स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता योजनेतून एकवेळ लाभ घेता येईल. सदर योजनेतून पात्र प्रवाशांची निवड ही पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे करण्यात येईल.

या योजनेतून निवड होण्यासाठी इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. सदरअर्ज करण्यासाठी नवीन वेबसाईट तयार करण्याचे काम शासनस्तरावर सुरू आहे. अर्ज करताना आधारकार्ड, रेशनकार्ड, अधिवासबाबत पुरावा, उत्पन्न दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक, योजनेच्या अटी पालन करणेबाबत हमीपत्र आदी  कागदपत्रे आवश्यक राहतील.

योजनेचे अर्ज स्विकारणे कामी शासन स्तरावरून पोर्टल सुविधा उपलब्ध करून देणे बाबत कार्यवाही सुरू आहे. तत्पुर्वी योजनेच्या अनुषंगाने इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी कागदपत्रांची पुर्तता आपले स्तरावर करावी व पोर्टल सुरू होताच अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact