सक्रिय योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान; भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा  उपक्रम

कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर  : सोलापुरात ज्येष्ठांसाठी आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेत  ‘ज्येष्ठ नागरिकांचे आहार व पोषण’ याविषयी आहारतज्ञ तस्लिम चौधरी, देविका डोंगरेकर यांनी मार्गदर्शन केले.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार यांच्या उपक्रमांतर्गत सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC) तथा प्रादेशिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र (RRTC) मुंबई व सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक संघांची शिखर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विजयपूर रोड येथील आदित्य नगर सांस्कृतिक सभागृहात ‘ज्येष्ठ नागरिकांचे आहार व पोषण’ या विषयावर आहारतज्ञ तस्लिम चौधरी, देविका डोंगरेकर आदींनी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी डफरिन चौकातील दमाणी ब्लड बँक येथे  डिजिटल साक्षरता विषयावर सायबर क्राईमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, प्रा. डॉ. प्रसन्न माधवराव गव्हाणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्प निदेशक संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक विजय भांगे,  संगणक अभियंता- सायबर तज्ञ अविनाश पाटील, कॉन्स्टेबल अश्विनी लोणीआदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. अखेरच्या कर्णिक नगर – एकता नगर येथील सत्रात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुरेश गायकवाड, मानसोपचार तज्ञ डॉ. निहार दिलीप बुर्ट, समाजसेविका डॉ. अपर्णा सुभाष कल्याणकर यांनी ‘ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य आणि मालमतेचे संरक्षण’ या विषयावर सखोल माहिती दिली.

कार्यशाळा समारोपाच्या या शेवटच्या दिवशी सक्रिय योगदान देणाऱ्या ज्येष्ठांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात पाच जणांना ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव व पाच जणांना ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सुलभा दातार, मरगू जाधव, निलकंठप्पा कोनापुरे, जयकुमार काटवे, मन्मथ कोनापुरे, शंकरराव  करजगी, गुरुलिंग कन्नूरकर, सिध्दाराम गोविंदे, दत्ता निवृत्ती भोसले, कृष्णात देवकर यांचा समावेश आहे.

पहिल्या दिवशीच्या सत्राचे प्रास्तविक शिखर समितीचे अध्यक्ष प्रा. विलास मोरे यांनी केले. दुसऱ्या दिवशी मुख्य समन्वयक गुरुलिंग कन्नूरकर यांनी तर तिसऱ्या दिवशीचे कोषाध्यक्ष प्रा. कृष्णात देवकर यांनी केले. स्वागत शिखर समितीचे सचिव मन्मथ कोनापुरे, बाळासाहेब पाटील, चन्नय्या स्वामी यांनी केले. प्रत्येक दिवशीच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्ट्ये याविषयीची माहिती प्रकल्प समन्वयिका निलिमा येतकर  यांनी दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *