अस्तित्व मेकर्स राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धा, रंगसाधक पुरस्कार महोत्सव अध्यक्षपदी संजय सावंत यांची नियुक्ती
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर: अस्तित्व मेकर्स राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धा व रंगसाधक पुरस्कार महोत्सव अध्यक्षपदी संजय सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
अस्तित्व मेकर्स फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धा व रंगसाधक पुरस्कार वितरण केले जाते. या महोत्सवाचे गेल्या दहा वर्षापासून आयोजन केले जाते. या लघुनाटिकेसाठी महाराष्ट्रातून निवडक तीस ते पस्तीस लघुनाटिका प्रवेशिका दरवर्षी येत असतात. दरवर्षी पदाची प्रतिष्ठा व सन्मान वाढवणारे महत्त्वाचे महोत्सव अध्यक्षपद सोलापूरच्या रंगभूमीसाठी योगदान देणाऱ्या, नवोदित कलावंतांना प्रोत्साहन देणाऱ्या, साहित्य, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ नाट्यकर्मी संजय सावंत यांची अस्तित्व मेकर्स राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धी व रंगसाधक पुरस्कार वितरण महोत्सव अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, असे अस्तित्व मेकर्स फाऊंडेशनचे सचिव किरण लोंढे यांनी कळविले आहे.
याप्रसंगी अस्तित्व मेकर फाऊंडेशनचे प्रमुख संयोजक ॲड. बसवराज सलगर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे, सचिव किरण लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंत यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले.
या राज्यस्तरीय लघुनाटिका महोत्सव स्पर्धेसाठी महाराष्ट्रात लोकप्रिय असणारी टी.व्ही चॅने वरील हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याप्रसंगी राज्यस्तरावर नाट्यक्षेत्रात प्रायोगिक रंगभूमीवर योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नाट्यकर्मीला राज्यस्तरीय रंगसाधक प्रमोद खांडेकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याचे स्वरूप रोख ११ हजार रुपये रोख रक्कम, गौरवपत्र व स्मृती चिन्ह असे असणार आहे.
हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय लघुनाटिका महोत्सव स्पर्धेसाठी अंदाजे चार ते पाच लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामध्ये सभागृह भाडे, बाहेरून स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व कलावंतांचे उत्कृष्ट जेवण, रोख स्वरूपात २१ हजार रुपयांपासून मोठया रक्कमेची पारितोषिके, सन्मान चिन्हे, प्रवास खर्च, मानधन व इतर खर्च इत्यादी गोष्टींचा समावेश असणार आहे. या स्पर्धेतील चुरस पाहता महाराष्ट्रातून जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन महोत्सवाचे अध्यक्ष संजय सावंत व अस्तित्व मेकर फाऊंडेशनचे सचिव किरण लोंढे यांनी केले आहे.
या राज्यस्तरीय लघुनाटिका महोत्सव यशस्वी करण्यासाठी सचिन जगताप, ओंकार साठे, तिपय्या हिरेमठ, सागर देवकुळे, निरंजन राऊळ, धनराज मडगोंड, विश्वेश्वरय्या स्वामी, प्रतीक कसबे, सोमनाथ लोखंडे, श्रवण घोडके, रुद्र बेसरे, अशपाक नदाफ आदी परिश्रम घेत आहेत.