डॉ. पी. पी. वावा : सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत आढावा
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : सफाई कर्मचाऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न हे आरोग्य व निवासस्थानाचे असतात. त्यामुळे जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागातील सर्व सफाई कर्मचारी यांची नियमित आरोग्य तपासणी तसेच त्यांच्या निवासस्थानाची दुरुस्ती कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी. वावा यांनी दिले.राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य वावा यांनी शनिवारी (दि. ४ जानेवारी २०२५) सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सामाजिक सल्लागार वीरेंद्रनाथ, संदीप चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, सहायक आयुक्त जिल्हा नगर प्रशासन अधिकारी विणा पवार, सहायक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे, महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार, उपायुक्त आशिष लोकरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख, समाज कल्याण अधिकारी सचिन कवले, पोलीस विभागाचे राजन माने, सफाई कामगार तक्रार निवारण समितीचे सदस्य खज्जप्पा दादनवस, वाळुंजकर, सायमन गट्टू, श्रीनिवास रामगल, बाली मंडेपू, जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचे मुख्याधिकारी, आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. वावा म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सफाई कर्मचाऱ्यांना मिळेल, यासाठी संबंधित प्रमुखांनी दक्षता घ्यावी. एकही सफाई कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाहीत, यासाठी प्रयत्न करावेत. सफाई कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. मेडिक्लेम योजनेचा लाभ सफाई कर्मचाऱ्यांना मिळावा, यासाठी जिल्ह्यातील बँकामार्फत प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सुचित केले.
- सफाई कामगारांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या घरांच्या योजनेबाबत आढावा घेण्यात आला.
- सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांबाबत, सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य शिबिराचे आयोजन, त्यांना हॅपिटायटीस बी इंजेक्शन याबाबत माहिती देण्यात आली. सीएसआर फंडामधून बँकांनी सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या उपचारासाठी पैसे देण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी बँकाना पत्र द्यावेत.
- सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारांमधून काही पैसे कापून त्यांना मेडिक्लेमसाठी कार्ड देण्यात यावेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या महिलांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत त्यांना चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष, स्वतंत्र शौचालय, महिला तक्रार निवारण समिती याबाबतच्या मागण्यांचा विचार करून ज्या ठिकाणी या सुविधा मिळत नाहीत, त्या देण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.
सफाई कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन व सेवा पुस्तके अद्यावत करण्याबाबत आढावा घेण्यात आला. सफाई कर्मचाऱ्यांना रमाई आवास योजना, पंतप्रधान मंत्री आवास योजनेंतर्गत घरांचे अनुदान वाटप मंजूर करण्याबाबत आढावा घेण्यात आला. सफाई कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर आर्थिक लाभाबाबत आढावा घेतला.
जिल्हाधिकारी होणार आशीर्वाद केंद्र जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती बैठकीत दिली. प्रशासन सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत संवेदनशील असून, सर्व शासकीय योजनांचा लाभ तत्काळ मिळण्यासाठी महापालिका, नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपाबाबत नियुक्ती त्यांची माहिती उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली. प्रास्ताविक जिल्हा नगर प्रशासन सहाय्यक आयुक्त विणा पवार यांनी केले. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील नगरपरिषदा, महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आढावा घेण्यात आला.