संरक्षण मंत्रालयाचे कार्यकारी संचालक सुशील गायकवाड यांचे व्याख्यान
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : के. भोगिशयन यांच्या स्मरणार्थ संरक्षण मंत्रालयाचे कार्यकारी संचालक सुशील गायकवाड यांचे व्याख्यान शनिवार, दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष धनश्री केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्यातर्फे दरवर्षी माजी कुलगुरु व रोटरीचे प्रांतपाल कै. के. भोगिशयन यांच्या स्मरणार्थ व्याख्यान आयोजित केले जाते. यावर्षी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचे कार्यकारी संचालक सुशील गायकवाड हे प्रमुख अतिथी म्हणून येत असून, ते सेल्फ रिलायन्स अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डिफेन्स सेक्टर (Self Reliance and Transformation of Defence Sector) या विषयावर इंग्रजीतून व्याख्यान देणार आहेत.अशी माहिती रोटरीच्या अध्यक्षा धनश्री केळकर यांनी दिली.
सदरचे व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे. विशेषतः महाविद्यालयीन युवक-युवती तसेच व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यासाठी हे व्याख्यान उपयुक्त असून त्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुशील गायकवाड यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरात घेतले असून, ते भारतीय रेल्वेच्या विविध उच्च पदावर कार्यरत होते. सोलापुरात ते भारतीय मध्य रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयात संचालक म्हणून कार्य केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी परिषदेच्या आंतरराष्ट्रीय गटावर त्यांनी काम केलेले आहे. त्यांना त्यांना कला व साहित्यामध्ये रुची असून, त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. कामानिमित्त देश- विदेशात भरपूर प्रवास, ट्रेकिंग व छायाचित्रकारितेचा छंद त्यांनी जोपासला आहे.
प्रोफेसर के. भोगिशयन हे सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. सन १९६० मध्ये ते या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. आणि १९८३ पर्यंत म्हणजे सलग २३ वर्षे त्यांनी प्राचार्यपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. शिक्षणक्षेत्रात एक कुशल प्रशासक आणि व्यासंगी प्राध्यापक म्हणून त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला होता. शिक्षणाबरोबरच शिस्त, चारित्र्य आणि मूल्यांवरची श्रद्धा या गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये व्हावा, यासाठी ते अविरत प्रयत्नशील राहिले. रेडक्रॉसच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, रोटरी क्लबचे प्रांतपाल, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष, कोल्हापूरच्या सायबर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, सोलापूरातील श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अशा विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे के. भोगिशयन यांच्या स्मरणार्थ गेल्या २० वर्षांपासून विविध विषयांवर तज्ञ व्यक्तींची इंग्रजीमध्ये व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. त्यामध्ये आजपर्यंत टाईम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक स्व. दिलीप पाडगांवकर, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नरेंद्र जाधव, शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, डॉ. पंडित विद्यासागर, प्रकाश बंग, महाभोक्ता ॲड. आशुतोष कुंभकोणी, न्यायमुर्ती अजित शाह, डॉ. एन. एम. कोंडप, रोटरीचे आंतरराष्ट्रीय माजी अध्यक्ष राजा साबू, कल्याण बॅनर्जी, रेखा शेट्टी, उद्योजक यतीन शहा, माजी सरन्यायाधीश उदय लळीत, श्री. गोविंद देव गिरीजी आदी नामवंत वक्त्यांचे विचार ऐकण्याचा लाभ सोलापूरकरांना मिळाला आहे.
या पत्रकार परिषदेस रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे सचिव निलेश फोफलिया, सलाम शेख, संदीप जव्हेरी, मितेश पंचमिया, सुहास लाहोटी, ब्रिजकुमार गोयदानी, संतोष कणेकर, पराग कुलकर्णी, निशांत डागा, आकाश बाहेती, सागर गोगरी आदी उपस्थित होते.