रोटरी क्लब ऑफ सोलापूर तर्फे के. भोगिशयना यांच्या स्मरणार्थ आयोजन

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी कुलगुरु व रोटरीचे प्रांतपाल दिवंगत के. भोगिशयना यांच्या स्मरणार्थ व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावर्षी अयोध्या येथील श्री राम मंदीरचे कोषाध्यक्ष परमपुज्य स्वामी गोविंद देव गिरीजी हे मॅनेजमेंट लेसन्स फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर इंग्रजीतून व्याख्यान देणार आहेत. हे व्याख्यान रविवार, दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता शिवस्मारक सभागृहात येथे होणार आहे. अशी माहिती अध्यक्ष  सीए सुनिल माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रोफेसर के. भोगिशयना हे सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. सन १९६०  मध्ये ते या महाविद्यालयाचे प्राचार्य झाले आणि १९८३ पर्यंत म्हणजे सलग २३ वर्षे त्यांनी प्राचार्यपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. सन १९८३ साली त्यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली. सन १९८६ पर्यंत त्यांनी कुलगुरू पदाचा कामकाज पाहिला. कुशल प्रशासक आणि व्यासंगी प्राध्यापक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. शिक्षणाबरोबरच शिस्त, चारित्र्य आणि मुल्यांवरची श्रद्धा या गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये व्हावा, यासाठी ते अविरत प्रयत्नशील राहिले. रेडक्रॉसच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, रोटरी क्लबचे प्रांतपाल, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष, कोल्हापूरच्या सायबर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, सोलापुरातील श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य पाहिले. अशा विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे के. भोगिशयना यांच्या स्मरणार्थ गेल्या २० वर्षांपासून विविध विषयांवर तज्ञ व्यक्तींची इंग्रजीमध्ये व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. आजपर्यंत टाईम्स् ऑफ इंडियाचे माजी संपादक स्व. दिलीप पाडगांवकर, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नरेंद्र जाधव, शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, डॉ. पंडित विद्यासागर,   प्रकाश बंग, महाभियोक्ता व ऍड.आशुतोष कुंभकोणी, न्यायमुर्ती अजित शाह, डॉ. एन. एम. कोंडप, रोटरीचे आंतरराष्ट्रीय माजी अध्यक्ष राजा साबू, कल्याण बॅनर्जी, रेखा शेट्टी, यतीन शहा, माजी सरन्यायधीश उदय लळीत आदी नामवंत वक्त्यांचे विचार ऐकण्याचा लाभ सोलापूरकरांना मिळणार असल्याचे अध्यक्ष  सीए सुनिल माहेश्वरी यांनी सांगितले. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून, सोलापूरकरांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

या पत्रकार परिषदेस सचिव ब्रिजकुमार गोयदानी, सीए राजगोपाल मिणियार, खजिनदार मितेश पंचमिमा,  कालिदास जाजू, संदीप झवेरी, निलेश फोफलिया आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact