• महाराष्ट्राच्या पहिल्या डावात १९३ धावा; अझीम काझीचे दमदार अर्धशतक

  • महाराष्ट्र V/s विदर्भ रणजी संभाव्य संघ पहिला सराव सामना

by kanya news ||

सोलापूर :  इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर मंगळवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ रणजी संभाव्य खेळाडूंच्या निवडीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या पहिल्या सराव सामन्यात दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेंव्हा विदर्भ संघाने ९ बाद १७२ धावा (४७ षटके) करीत महाराष्ट्राच्या पहिल्या डावातील १९३ धावांच्यावर ८० धावांची बढत घेतली असून, उद्या पहिल्या सत्रात सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी महाराष्ट्राने पहिला डाव कालच्या ४ बाद ९७ वरून पुढे सुरू केला आणि कालची नाबाद अझीम काझी-निखील नाईकची जोडी   दूशंत टेकनने फोडली. त्याने निखील (१४ धावा) याला यष्टिरक्षकाकडे झेल द्यायला भाग पाडून बाद केले. त्यानंतर आलेला यश क्षीरसागर (००) जास्ती काळ टिकू शकला नाही. पण दुसऱ्या बाजूने अझीमने त्याचे अर्धशतक (५२ धावा, ९० चेंडू, ५ चौकार) झळकावत सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णी (२३ धावा) सोबत ४१ धावांची भागीदारी रचली. हे दोघे पाठोपाठ बाद झाल्यानंतर लगेच रजनीश गुर्बानी (००) बाद झाला. शेवटची जोडीसाठी सत्यजीत बच्छाव (१६) आणि मुकेश चौधरी (१०) यांनी २० धावा जोडल्या आणि जेवणाच्या वेळी महाराष्ट्राचा पहिला डाव १९३ धावांवर थांबला.

मध्यंतरानंतर विदर्भाने दुसऱ्या डावाची सुरुवात कालचा सलामीवीर सत्यम भोयर आणि अर्धशतकवीर अमन मोखाडेने केली. परंतु पुन्हा एकदा पहिल्याच षटकात मुकेश चौधरीने चौथ्याच चेंडूवर पहिला झटका दिला तो भोयरला बाद करत. परंतु अमनने मंदार महाले (१२) आणि सिद्धेश वाठ (३) सोबत एकतर्फी किल्ला लढवत धावफलक हलता ठेवत सामन्यात सलग दुसरे अर्धशतक झळकावले. तो ७५ धावा काढून अर्शिनकडून पायचीत झाला. त्यानंतर यश कदम (२९) आणि कर्णधार अक्षय वाडकर (२८) भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. पण तरणजित धिल्लोन ने (३८ धावात तीन बळी) त्या दोघांसह हर्ष दुबे (००) ला देखील लागोपाठ बाद करत २ धावात ३ गडी टिपत माघारी धाडले. शेवटचे फलंदाज दर्शन नालकांडे (५), गौरव ढोबळे (००) यांनी पार्थ रेखाडे (नाबाद १२) सोबत जास्तीच्या धावांची बढत घेण्याचा प्रयत्न केला पण तेज गोलंदाज रामकृष्ण घोष ने (२१ धावात तीन बळी) दोघांना बाद केले.

दिवसाला खेळ थांबला तेंव्हा विदर्भने दुसऱ्या डावात ९ बाद १७२ करत महाराष्ट्रवर ८० धावांची बढत घेतली. तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात राहिलेला १ गडी लवकर बाद करून महाराष्ट्राला सामना जिंकण्याची संधी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact