
ट्रंकवाला,वीर यांची दमदार शतके;संभाव्य २८ खेळाडूंची विभागणी दोन संघात
by kanya news||
सोलापूर : येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर दि. १ ऑगस्टपासून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठ पुरुष गटाचे रणजी ट्रॉफी साठीचे निवड चाचणी शिबीर सुरु असून, त्यात २८ खेळाडूंचा समावेश आहे.या संभाव्य खेळाडूंच्या निवडीच्या दृष्टीने खेळविण्यात आलेला पहिला चार दिवसीय सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. संभाव्य २८ खेळाडूंची विभागणी प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी इलेव्हन अशा दोन संघात करण्यात आली होती.
अनिर्णीत सामन्यात सेक्रेटरी इलेव्हन संघाने पहिल्या डावात आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना प्रेसिडेंट संघाने १००.१ षटकात ७ बाद ३८४ धावा केल्या होत्या. सलामीवीर मुर्तजा ट्रंकवाला (१०२ धावा, १३७ चेंडू, १३ चौकार, ३ षटकार) याने हर्षल काटे (४८ धावा) सोबत शतकी सलामी दिली. सोबत आयपीएल खेळाडू तसेचएमपीएलमधील स्टार खेळाडू राहुल त्रिपाठी ५० धावा व भारतीय ज्युनिअर संघातील मधल्या फळीतील उत्तम फलंदाज सचिन धसने ५८ धावा केल्या.
दिग्विजय पाटील ३५, कप्तान अजीम काझी २५, सौरभ नवले (यष्टीरक्षक) ३१, मुकेश चौधरी २३ धावा केले. सेक्रेटरी इलेव्हन संघाकडून गोलंदाजी करताना सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीने ५८/२ बळी, हिंगोलीच्या सन्नी पंडितने ७७/२ बळी घेतले. त्यांच्यासोबत रामकृष्ण घोष, वैभव गोसावी, विकी ओस्तवाल यांनी प्रत्येकी एकेक बळी घेतले. सेक्रेटरी इलेव्हन संघाने १०५.५ षटकात ७ बाद ४०५ धावा केल्या. त्यांच्याकडून देखील सलामीवीर सिद्धेश वीर (१०० धावा, १६९ चेंडू १२चौकार २ षटकार) याने कप्तान मंदार भंडारी (८९ धावा) सोबत जबरदस्त सलामी दिली. नंतर आलेल्या यश क्षीरसागर (५० धावा), आर्शिन कुलकर्णी (३३ धावा), सिद्धार्थ म्हात्रे याने नाबाद ५८ धावा केल्या. गोलंदाजी करताना सत्यजित बच्छाव ३३/२ बळी, प्रशांत सोळंकी ५५/२ बळी, हितेश वाळुंज, तरणजीत धिल्लोन, दिग्विजय पाटील यांनी एकेक बळी घेतले.
तिसऱ्या डावात पुन्हा प्रेसिडेंट संघाने फलंदाजी करताना सामना थांबविला गेला तेंव्हा २०.१ षटकात ४ बाद ७५ धावा केल्या. सलामीला येत कप्तान अझीम काझी ३५ धावा केल्या तर प्रशांत सोळंकीने २०/३ बळी, वैभव गोसावीने एक बळी घेतला. या सामन्यात पंच म्हणून अनिश सहस्त्रबुद्धे, नंदकुमार टेळे तर गुणलेखक म्हणून मिलिंद गोरे यांनी काम पाहिले.
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उत्तम नियोजन
गेल्या वर्षी महाराष्ट्र रणजी संघाचे सराव शिबीर सोलापुरातील हिरव्यागार मैदानावर उत्तम खेळपट्टी असल्याने घेतले होते. यावेळीदेखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने हे शिबीर सोलापुरात घेण्याची सोलापूर जिल्हा क्रिकेटचे संधी दिली असून, सर्व खेळाडूंची राहण्याची खाण्याची व्यवस्था, सकाळ दुपार सत्रात स्टेडियमवरील सरावाचे, सराव दरम्यान इतर व्यवस्थेचे उत्तम नियोजन जिल्हा संघटनेचे चेअरमन आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष दिलीप माने, सचिव खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत रेम्बर्सु यांच्या नेतृत्वाखाली इतर सहकारी पदाधिकारी व निगडित लोकांकडून केल्याचे दिसून येत आहे. येत्या दि. १३ ऑगस्टपासून दुसरा सराव सामना होणार असल्याचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी सांगितले.