अझीम काझीने मिळवून दिला विजय;

महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ रणजी संभाव्य संघ पहिला सराव सामना

 by kanya news ||

सोलापूर : येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या  सराव सामन्यात  अतिशय रंजक परिस्थिती निर्माण होऊन अझीम काझीच्या संयमी फलंदाजीने महाराष्ट्राला दोन गडी राखून विजय मिळवून दिला.

  • विदर्भ संघाने  ९ बाद १७२ धावांवरून डाव पुढे सुरू केला खरा पण तिसऱ्याच चेंडूवर रामकृष्ण घोषने आपला चौथा बळी घेत प्रफुल्ल हिंगे याला सचिन धसकडे झेल द्यायला भाग पाडला आणि त्याच  धावसंख्येवर विदर्भाचा डाव संपुष्टात आला. त्यामुळे महाराष्ट्राला जिंकण्यासाठी ८१ धावांचे लक्ष मिळाले.

महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावाची सुरुवात सचिन धस व मुर्तजा ट्रंकवाला यांनी केली, खरी पण चौथ्याच षटकात फिरकी गोलंदाज पार्थ रेखाडे याने मुर्तझा (१) व यश क्षीरसागर यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करीत सामन्याला रंजक स्थितीत आणून सोडले.

सचिन धससोबत सोलापूरच्या अर्शिनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण तो वैयक्तिक ११ धावा काढून बाद झाला. सचिनही (३) लगेच तंबूत परतला. या दोघांना हर्ष दुबेने बाद केले. जेवणासाठी खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राची ५ बाद ३५ धावा अशी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर आलेल्या सिद्धेश वीर (९), मुकेश चौधरी (५), मंदार भंडारी (७)  यांना देखील जम बसविता आला नाही आणि मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे ८ बाद ४५ अशी सामन्याची रंजक स्थितीत निर्माण झाली.

सकाळी पहिल्याच षटकात बळी मिळवला आणि केवळ ८१ धावा महाराष्ट्र संघ जेवणाच्या वेळेच्या आधी सहज पूर्ण करेल असे वाटत असताना विदर्भाच्या तेज तसेच फिरकी गोलंदाजांनी सामना त्यांच्या बाजूला पुन्हा एकदा झुकवला. कर्णधार निखील नाईक (१) याला बाद केले. परंतु  महाराष्ट्राचा आणखी एक हुकमी, संयमी फलंदाज अझीम काझीने एक बाजू लावून धरत निखील आणि सत्यजित बच्छावसोबत २०-२० धावांची गरजू भागीदारी रचत ३१ धावांवर नाबाद राहिला, सत्यजितने ऐन मोक्याच्या क्षणी चौकार मारत सामना जिंकून दिला.

विदर्भकडून हर्ष दुबे व पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी तीन तर दुषांत टेकन, गौरव ढोबळे यांनी प्रत्येकी एकेक बळी मिळविले. दि. २३  ऑगस्ट रोजी एक दिवसाची विश्रांती असेल. दि. २४ तारखेपासून दुसरा सराव सामना होणार असल्याचे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सू यांनी कळविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact