आषाढीच्या उत्कृष्ट नियोजनामुळे बक्षीस देऊन गौरव
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : आषाढीच्या उत्कृष्ट नियोजनामुळे रेल्वे वाणिज्य विभागातील कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. आषाढी यात्रेच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच देशभरातून वारकरी मोठ्या संख्येने विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सोलापूर रेल्वे विभागाने उत्तम नियोजन केले होते. त्यामुळे भक्तगण समाधानी झाले होते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांना संपूर्ण माहिती सोप्या भाषेत सांगण्याचे काम कर्तव्यावर स्थित असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र केले.
या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल स्वतः मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव आणि सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांनी घेतली. या कर्मचाऱ्यांना त्यांनी बक्षीस जाहीर करीत त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर रेल्वे विभागातील तिकीट निरीक्षक,वाणिज्य विभागातील कर्मचारी, अन्य इतर कर्मचाऱ्यांना सोलापूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरविले.