सोलापूर रेल्वेच्या ओम अवस्थीला सुवर्ण, इशा वाघमोडेला रौप्यपदक

वॉटर पोलोमध्ये महेश कुथे, सुवजीत मुखर्जी सुवर्णपदकाचे मानकरी; ६४ वी ऑल इंडिया रेल्वे एक्वेटिक चॅम्पियनशिप

By Kanya News ।।

सोलापूर : ६४ व्या ऑल इंडिया रेल्वे एक्वेटिक चॅम्पियनशिपमध्ये सोलापूरच्या रेल्वे कर्मचारी खेळाडूंनी घवघवीत यश संपादित केले आहे. सोलापूर रेल्वेच्या ओम अवस्थी याने डायव्हिंग प्लॅटफॉर्म इव्हेंटमध्ये सुवर्ण तर वॉटर पोलोमध्ये सुवर्ण सांघिक विजेतेपद पटकावलेल्या संघात सोलापूरच्या रेल्वे विभागातील तिकीट निरीक्षक महेश कुथे आणि सुवजीत मुखर्जी या दोघांचा समावेश आहे.
वॉटर पोलो (सांघिक) या सांघिक खेळ प्रकारात मध्य रेल्वेला सुवर्ण पदक मिळाले. यामध्ये दोन खेळाडू हे सोलापूर रेल्वे विभागाचे सहभागी होते.
सोलापूर रेल्वे विभागातील तिकीट निरीक्षक महेश कुथे आणि सुवजीत मुखर्जी या दोघांचा समावेश आहे.

पुरुष गटातील डायव्हिंग प्लॅटफॉर्म इव्हेंटमध्ये सोलापूर रेल्वे विभागाचा २० वर्षाचा खेळाडू ओम अवस्थी याने सुवर्ण पदक पटकावले. स्प्रिंग बोर्ड प्रकारात रौप्यपदक पटकावले. डायव्हिंगमधील सिनियर नॅशनल सिलेक्शन ट्रायल्समध्ये महिलांच्या गटात प्लॅटफॉर्म इव्हेंट, ३ मीटर स्प्रिंग बोर्ड, १ मीटर स्प्रिंग बोर्ड या तीनही प्रकारात सोलापूरची तिकीट निरीक्षक इशा वाघमोडे हिने द्वितीय स्थानासह रौप्यपदक पटकावले.

या सर्व खेळाडूंच्या भरीव कामगिरीमुळे मध्य रेल्वेला डायव्हिंगमध्ये सर्व साधारण विजेतेपद मिळाले आहे. या खेळाडूंनी अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने हे यश संपादित केले आहे. डायव्हिंग-प्लॅटफॉर्म इव्हेंटमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या ओम अवस्थीला सराव करतेवेळी त्याच्या कानाच्या अंतर्गत भागात गंभीर स्वरूपातील दुखापत झाली असतानाही त्याने हार न मानता हे यश संपादित केले. आगामी काळात जागतिक पातळीवर, मध्य रेल्वेचे नाव देशपातळीवर लौकिक करण्याचा मानस या खेळाडूंनी बोलून दाखवला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांनी कौतुक केले आहे. पश्चिम रेल्वेने ऑल इंडिया रेल्वे एक्वेटिक चॅम्पिअनशिप आयोजित केली होती. महालक्ष्मी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई येथे या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यायशाबद्दल या सर्व खेळाडूंचा सत्कार सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे, अप्पर रेल्वे विभागीय व्यवस्थापक अंशुमाली कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, विभागीय रेल्वे क्रीडा अधिकारी शीतल वली, रेल्वे मुख्य चिकित्सा अधिकारी आनंद कांबळे, वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) सचिन गणेर, वरिष्ठ विभागीय सामग्री व्यवस्थापक रामचरण मीना आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact