विवेकानंद केंद्रातर्फे श्री शिवछत्रपती रंगभवन येथे

 “तेजस्वी नक्षत्रं अन् सुगंधी पुष्पं” या  पुस्तकाचे प्रकाशन

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पद्मश्री  निवेदिता भिडे लिखीत “तेजस्वी नक्षत्रं अन् सुगंधी पुष्पं” या पुस्तकाचे बुधवार, दि. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी  सायंकाळी ६.३० वाजता प्रकाशन होणार आहे. श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा तथा ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे असतील, अशी माहिती विवेकानंद केंद्राचे संचालक दीपक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नंदकुमार चितापुरे, सिद्धाराम पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ज्यांनी आपले संपूर्ण जीवन विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून देशसेवेसाठी दिले, त्यांना जीवनव्रती म्हणतात. पद्मश्री निवेदिता या मागील ४५ वर्षांपासून जीवनव्रती आहेत. तामिळनाडूतील खेड्यांपासून ते अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागापर्यंत आणि कन्याकुमारी येथील शाळेच्या मुख्याध्यापिकेपासून ते जी २० अंतर्गत सी २० पर्यंत लेखिकेने शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. या काळातील अनुभवांचे संकलन म्हणजे तेजस्वी नक्षत्रं.. हे पुस्तक आहे, अशी माहिती नंदकुमार चितापुरे यांनी दिली. निवेदिता भिडे आणि अरुणा ढेरे या मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी सोलापूरकरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चितापुरे यांनी केले.

==============================================================================

 “तेजस्वी नक्षत्रं अन् सुगंधी पुष्पं” या पुस्तकाविषयी..

आकाशातील तेजस्वी नक्षत्रं आपल्याला हवीहवीशी वाटली तरी ती आपल्या हाती येत नाहीत. पण आपल्या अवतीभोवती अनेक सुगंधी फुले उमललेली दिसतात. ती आपले जीवन सुगंधित करतात. अशाच रीतीने समाजात अनेक सर्वसामान्य व्यक्ती शांतपणे प्रेरक जीवन जगत असतात. लेखिकेला जीवनव्रती म्हणून सुमारे साडेचार दशके काम करताना भेटलेल्या सामान्य माणसांच्या प्रेरक स्मृतींचे संकलन म्हणजे हे पुस्तक आहे. वाचकाचे आयुष्य अर्थपूर्ण आणि हेतूपूर्ण करण्याचे संस्कार हे पुस्तक करते, अशी माहिती सिद्धाराम पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact