जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना;

लाभार्थ्यांच्या खात्यावर दि.१४ ऑगस्टपासून पैसे जमा होण्यास सुरुवात

 by kanya news||

सोलापूर : जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; लाभार्थ्यांच्या खात्यावर दि.१४ ऑगस्टपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात ६,१४,७०० अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ५,९४,५८७ अर्जांना मंजुरी मिळाली आहे.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा” राज्यस्तरीय शुभारंभ शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. याचे थेट प्रक्षेपण हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे झाले.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते या योजनेचा लाभ मंजूर झालेल्या महिला लाभार्थ्यांना तसेच या योजनेचे अर्ज भरणारे ऑपरेटर यांना प्रतिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा परिषदेचे महिला बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, विधानसभा क्षेत्र निहाय स्थापन केलेल्या समित्यांचे अध्यक्ष,सदस्य, सोलापूर जिल्ह्यातील सातशे ते आठशे महिला लाभार्थी उपस्थित होत्या.

सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून ग्रामीण पातळीपर्यंत प्रचार प्रसिद्धी करून ही योजना प्रशासनाने प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवली. त्यामुळे जिल्ह्यात आज रोजीपर्यंत सहा लाख १४ हजार ७०० अर्ज प्राप्त झालेले आहेत.  विधानसभा क्षेत्र निहाय समित्यांनी त्यातील ५ लाख ९४ हजार ५८७ अर्ज मंजूर केलेले आहेत. दि. १४ ऑगस्ट २०२४ पासून या योजनेत अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

============================================================================

तालुका निहाय अर्ज मंजूर झालेली संख्या पुढीलप्रमाणे:

 अक्कलकोट ४५ हजार १४८, बार्शी ५५ हजार ४२१, करमाळा ३३ हजार ६३५, माढा ४३ हजार २४७,  माळशिरस ६६ हजार २५४, मंगळवेढा ३४ हजार २५८, मोहोळ ३९ हजार ८४८, उत्तर सोलापूर १ लाख ६ हजार ५८१, पंढरपूर ६४ हजार ७८०, सांगोला ४२ हजार ९३०, दक्षिण सोलापूर ६२ हजार ४८५.

============================================================================

लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांची प्रतिक्रिया:

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दि. १४ ऑगस्ट रोजी माझ्या बँक खात्यावर  ३००० रुपये जमा झाले. याबद्दल मी मुख्यमंत्री   एकनाथ शिंदे,  शासनाची खूप खूप आभारी आहे. माझ्यासारख्या लाखो बहिणींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाची आहे. बँक खात्यावर पैसे जमा झाल्याने खूप खूप समाधान आहे. ही योजना अशीच निरंतर सुरू राहावी.

   – भाग्यश्री कोळी, सोलापूर

—————————————————————————————————————————-

  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दि. ४  जुलै २०२४  रोजी नारीशक्ती दूत ॲपवर ऑनलाईन अर्ज भरला होता. मुख्यमंत्री महोदय दोन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील, असे वारंवार सांगत होते. त्यांचे म्हणणे खरे ठरले. दि. १५ ऑगस्ट रोजी माझ्या खात्यावर दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले. त्याचा मला खूप खूप आनंद झाला आहे. ही योजना अशीच निरंतर सुरू ठेवावी. यातून माझ्या कुटुंबाचा खर्च भागवण्यास मला मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री महोदय व राज्य शासनाचे मी व माझ्यासारखे अनेक बहिणी आभार व्यक्त करत आहेत.

 – अंजली बसवराज बेंचे, सोलापूर

=============================================================================

 योजनेअंतर्गत आज अखेरपर्यंत प्रशासनाने केलेली कार्यवाही-

  •  सर्व अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे योजनेबाबत (अर्ज स्विकृती, ऑनलाईन अर्ज भरणे, छाननी बाबत प्रशिक्षण घेतले)
  •  सर्व अंगणवाडी केंद्रांवर, ग्रामपंचायत कार्यालयासत योजनेचे अर्ज उपलब्ध करून दिले.
  •  पालखी मार्गावर / वारी मार्गावर हिरकणी कक्षाच्या माध्यमातून योजनेचे मोठे बॅनर लावून प्रचार व प्रसिध्दी केली.
  •  ग्रामपंचायत स्तरावर अर्ज भरणे आधार कार्ड अपडेट करणे बँक खाते उघडणे याबाबत शिबीरांचे आयोजन केले.
  • मंडल स्तरावर उत्पन्न दाखला रेशन कार्ड अपडेट करणे याबाबत शिबीरांचे आयोजन६. आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र यांचे ऑनलाईन अर्ज भरणेबाबत प्रशिक्षण घेतले.
  • जिल्हाधिकारी तसेच  मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेमार्फत योजनेबाबत सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, बालविकासअधिकारी यांची नियमित आढावा सभा घेवून योजनेच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.  
  •  शासनामार्फत प्राप्त झालेले प्रचार, प्रसिध्दी साहित्य जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्र, ग्रामपंचायत यांमध्ये ४८ तासांच्या आत लावण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.  त्यानुसार कार्यवाही सुरु आहे.
  •  दि.२० जुलै २०२४  रोजी योजनेच्या जनजागृतीबाबत तसेच अपूर्ण प्राप्त अर्ज त्रुटी पूर्तता, १०० टक्के लाभार्थी यांचे अर्ज भरून घेण्याच्या उददेश्याने महिलांच्या विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले.
  •  अर्ज स्विकारण्यासोबतच आधार सिडींग असलेची खातरजमा करणेची कार्यवाही आपले सरकार कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत सुरु आहे.
  •  ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत सूचना दिल्या असून, दर शनिवारी पात्र लाभार्थ्याच्या यादीचे चावडीवर वाचन करण्यात येत आहे.  अपूर्ण कागदपत्रांची त्रुटी पूर्तता करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातून या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.  ६ लाख १४ हजार ७०० अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ५ लाख ९४ हजार ५८७ अर्जांना मंजुरी देण्यात आलेली आहे.
  • या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा त्यांच्या बँक खात्यावर थेट पंधराशे रुपये जमा होणार आहेत. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर दि. १४ ऑगस्ट २०२४ पासून थेट दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

==============================================================================

  • जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते लाभ मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र वाटप
  • या योजनेचा पुणे येथील राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम लाईव्ह पाहण्यासाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथे शेकडो लाभार्थी महिलांची उपस्थिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact