मोहक, सुखद, नैसर्गिक रंगाबरोबर घडली शाश्वत मुल्यांची पेरणी
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : “तब्बल साठ वर्षे मी जंगलात फिरलो, रमलो, सहकुटुंब वास्तव्य केले.! बर्याच गोष्टी समजून घेता आल्या. अजूनही वाचन आणि अभ्यास सुरुच आहे. त्यामुळे आजवरचा अनुभव म्हणून सांगतो, आपण शाश्वत मुल्य जपले, नैसर्गिक जीवन जगले तर निसर्ग आपल्याला भरभरून देतो. निसर्गाच्या विपरित वागू नका. त्याची काळजी घ्या. त्यातच आपले सर्वांचे हित आहे. रंगपंचमीचा रंग खेळताना देखील निसर्गाचे नियम पाळा!” असे कळकळीचे भावोद्गार काढत पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी उपस्थितांशी हितगूज साधला. निमित्त होते ‘अभिर गुलाल रंगोत्सवाचे’.
यावेळी पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या सोबतीने टिळा लावून व गालावर नैसर्गिक रंगांच्या छटा उमटावत रविवारी पर्यावरणपूरक रंगोत्सव साजरा करण्यात आला. त्यात अरण्यऋषींशी हितगुज साधण्याचा दुग्धशर्करा योगही जुळून आला.
सदर कार्यक्रम सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक संघाची संयुक्त शिखर समिती आणि आदर्श ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाच्या विद्यमाने अक्कलकोट रोड स्थित उद्यानात पार पडला. हेरिटेज मणिधारी सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने अन आबालवृद्धांसह महिलांच्या लक्षणीय सहभागाने त्याला हर्षोल्हासाचे, देखणे व संस्मरणीय असे स्वरुप प्राप्त झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आदर्श ज्ये. ना. संघाचे अध्यक्ष विजयकुमार भोसले यांनी स्वागतपर संबोधन केले. प्रास्ताविक शिखर समितीचे मुख्य समन्वयक गुरुलिंग कन्नुरकर यांनी केले.
यावेळी शासकीय संनियंत्रण समिती सदस्य महादेव माने, शिखर समितीचे उपाध्यक्ष अरुण कदम, सचिव मन्मथ कोनापुरे, सोलापूर विकास मंचचे योगीन गुर्जर, सोलापूर ज्ये. ना. संघाचे अध्यक्ष घनश्याम दायमा, कर्णिकनगर संघाचे अध्यक्ष कृष्णात देवकर, समर्थ संघाचे अध्यक्ष बाबूराव नरुणे, रमेश खाडे, मणिधारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष गजानन होनराव, माजी अध्यक्ष नवीन तापसे, सुरेशराव येळमेली,स्वप्नील सोलनकर यांच्यासह बालगोपाल, महिला-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश आळगी, सचिन पतंगे, सतीश नोमूल, अंकुश माने, मल्लप्पा मुळजे, सिद्रामप्पा गोविंदे, त्र्यंबक जाधव, शिवाजीराव क्षीरसागर, राहुल म्हमाणे, रविंद्र मच्छी, अंबादास खराडे, शंकरराव गाडी, श्रीनिवास चिट्टमपल्ली, श्रीकांत चित्तमपल्ली यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय जोगीपेटकर यांनी केले.