पद्मशाली सखी संघमतर्फे मनपाला निवेदन
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री महर्षी मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव सोहळा येत्या दि. ९ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा (रक्षा बंधन) निमित्ताने साजरा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर मार्कंडेय रथोत्सव मार्गावरील खड्डे बुजवावेत आणि मार्गावर अडसर ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात, अशी मागणी पद्मशाली सखी संघमच्यावतीने सोलापूर महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सादर मागणीचे निवेदन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांना पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा मेघा इट्टम, सल्लागार ममता मुदगुंडी व कल्पना अर्शनपल्ली यांनी दिली आहे.
मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव’ कार्यक्रम पूर्व भागातील विविध मार्गावरुन मोठ्या भक्तीमय,धार्मिक वातारणात लाखों समाज बांधवांच्या सहभागाने परंपरेप्रमाणे दरवर्षी मोठ्या थाटामाटात पार पाडला जातो. सिध्देश्वर पेठेतील पद्मशाली ज्ञाती संस्थेच्यावतीने श्री मार्कंडेय मंदिर येथे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींच्या दर्शनासाठी पहाटे ४ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडत असतात. त्यामुळे मार्कंडेय रथोत्सव मार्गावरील खड्डे बुजवा आणि अडसर ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडा, अशी मागणी केली आहे.
सिध्देश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिर येथून विजयपूर वेस, भारतीय चौक, श्री रत्न मारुती देवस्थान मार्गे (सुभाषचंद्र बोस उद्यान समोरुन), जमखंडी फूल, पद्मशाली चौक, कुचन नगर मार्गे, दत्तनगर, श्री मार्कंडेय सोलापूर रुग्णालय समोरुन, भद्रावती पेठ, जोडबसवण्णा चौक, श्री मार्कंडेय चौक (ताता गणपती चौक), राजेंद्र चौक, भुलाभाई चौक, जोडभावी पेठ (म्हेत्रे निवास) वळसा घालून, कन्ना चौक, औद्योगिक बँक, साखर पेठ, सोमवार पेठ, समाचार चौक, माणिक चौक, आजोबा गणपती समोरुन पुन्हा विजापूर वेस मार्गे सिध्देश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिर येथे सांगता होईल. सदरच्या मार्गावरुन रथोत्सव मार्गस्थ होणार आहे.
रस्त्यांवरील ‘खड्ड्यां’मुळे रथोत्सवाला घालबोट लागू नयेत, म्हणून ‘तातडीने सदरचे खड्डे बुजवून घेणे तसेच सदरच्या मार्गावरील वाढलेल्या झाडांच्या फांदे तोडणे’ आणि दि. ९ ऑगस्ट रोजी श्री मार्कंडेय मंदिर येथे पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात होत असल्याने ‘परिसर स्वच्छ होण्यासाठी’ आपल्या स्तरावर संबंधितांना आदेश व्हावेत, अशी विनंतीवजा मागणी करण्यात आली आहे.
वरील आशयाचे निवेदन सोलापुरातील पद्मशाली सखी संघमच्यावतीने अध्यक्षा मेघा इट्टम, सल्लागार ममता मुदगुंडी व कल्पना अर्शनपल्ली यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांना समक्ष भेटून सादर केले.