तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग; तत्काळ तक्रारींचा निपटारा करावा
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर: लोकशाही दिनात सोलापूर जिल्ह्यातील १५ शासकीय कार्यालयात ३८ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग करण्यात येत असून, त्या कार्यालयांनी तत्काळ या तक्रारींचा निपटारा करावा. तक्रार करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांशी सर्व संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी चांगली वर्तणूक ठेवावी, असे निर्देश महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या लोकशाही दिनात भुसंपादन समन्वय अधिकारी संतोषकुमार देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, आरोग्य विभागाचे डॉ. विजय वरवटकर, तहसीलदार पुनर्वसन सरस्वती पाटील यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
लोकशाही दिनात संबंधित शासकीय कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी पुढीलप्रमाणे:
जिल्हा परिषद सोलापूर- १६, भुसंपाद समन्वय शाखा-३, अधीक्षक अभियंता महावितरण सोलापूर-३, सहायक कामगार आयुक्त सोलापूर-१, उपविभागीय अधिकारी पंढरपूर-१, जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर-१, तहसीलदार महसूल-३, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन-१, कार्यकारी अभियंता पाटबंधारे प्रकल्प मजबुतीकरण विभाग, धाराशिव-१, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम सोलापूर-१, दुय्यम चिटणीस सोलापूर-१, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण-२, उपनिबंधक सहकार सोलापूर-१, तहसीलदार दक्षिण सोलापूर-१, तहसीलदार मोहोळ-१ व एका अर्जदारास संबंधित विभागाने परस्पर उत्तर दिले असून, एकूण ३८ तक्रारी अर्ज जिल्हा लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या आहेत.