लिंगायत समाजाच्या न्याय, हक्काच्या विविध मागण्यांसाठी
येत्या ऑक्टोबरमध्ये लिंगायत जोडो बसव यात्रा
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : राष्ट्रीय लिंगायत संघाच्यावतीने लिंगायत समाजाच्या न्याय व हक्काच्या विविध मागण्यांसाठी येत्या ऑक्टोबरमध्ये महात्मा बसवेश्वरांची कर्मभूमी मंगळवेढा ते मुंबई लिंगायत जोडो बसव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय लिंगायत संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाले आणि महाराष्ट्राचे राज्य समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राज्य समन्वयक विजयकुमार हत्तुरे म्हणाले, लिंगायत समाजाच्या न्याय व हक्कासाठी सकल लिंगायत समाजाच्यावतीने संपूर्ण राज्यभर चळवळ उभी करण्यात येत असून, महाराष्ट्र राज्य शासनाला जागे करण्यासाठी समाजाच्या विविध मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी मंगळवेढा ते मुंबई अशी सात मतदार संघातून २१ किलोमीटरची लिंगायत जोडो बसव यात्रा काढण्यात येणार आहे.
या लिंगायत जोडो बसव यात्रेचे नेतृत्व परमपूज्य चन्नबसय्या महास्वामीजी आणि माहिती राष्ट्रीय लिंगायत संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाले हे करणार आहेत. लिंगायत समाजाच्या विविध मागण्या आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक प्रकारची आंदोलने झाली, अनेकवेळा मोर्चादेखील काढण्यात आल्या. मात्र शासनाकडून केवळ आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. लिंगायत समाजाला तोंडाला पाणी पुसण्याचे काम शासनाने केले आहे. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ केवळ ओबीसी प्रमाणपत्र नसल्याने समाज बांधव या लाभापासून वंचित राहिला आहे. सरकार केवळ फसवणुकीचे काम करीत आहे. सरकारला जागे करण्यासाठी हे लिंगायत समाज बांधवाने उभारले आहे.
या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजशेखर कापसे, नामदेव फुलारी, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजशेखर तंबाखे, प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम माळी, अशोक भांजे, विजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
=============================================================================
या आहेत लिंगायत समाजाच्या विविध मागण्या..
- लिंगायत धर्माला संविधानीक मान्यता, अल्पसंख्यांक दर्जा देण्यात यावा.
- महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे महात्मा बसवण्णा यांचे राष्ट्रीय स्मारक मंजूर करून शासकीय निधी उपलब्ध करावा.
- लिंगायत समाजातील हिंदू-लिंगायत दाखल्यासहीत सर्व पोटजातींना ओबीसीचे आरक्षण देण्यात यावे.
- महात्मा बसवण्णा यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाला ५ हजार कोटी निधी मिळावा.
- लिंगायत समाजाला महाराष्ट्रामध्ये भाषिक अल्पसंख्यांक व केंद्रामधे अल्पसंख्यांक दर्जा द्यावा.
- महात्मा बसवण्णा यांचे वचन साहित्य शैक्षणिक अभ्यासक्रमात घ्यावे.
- लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये व नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे.
- लिंगायत समाजाला जनगणनामध्ये वेगळा कॉलम द्यावा.
- लिंगायत समाजातील शरण स्थळांना व मठांना तिर्थ क्षेत्राचा “अ” वर्ग दर्जा देण्यात यावा.
- गाव तिथे स्मशानभुमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी.
- दिल्ली येथील नवीन संसद भवनास महात्मा बसवण्णा यांचे नाव द्यावे.