श्रीलंका-भारत समुद्रात न थांबता पोहण्याचा किर्ती भराडिया करणार विश्वविक्रम
- येत्या २० सप्टेंबरला पहाटे २ वाजता समुद्रात झेप घेणार
- ३४ ते ४० किलो मीटरचे अंतर पोहून पूर्ण करणार
- सदरचे अंतर न थांबता पोहून पूर्ण करण्यास समुद्रात सलग १२ ते १४ तास पोहावे लागणार
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर: सोलापूरची विश्वविक्रमी सागरकन्या किर्ती नंदकिशोर भराडिया (वय-१८ वर्षे) आता नवा विश्वविक्रम करण्यास सज्ज झाली आहे. येत्या दि. २० सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजता श्रीलंकेतील तलाईमनार ते भारतातील धनुषकोडी (रामेश्वर) हे सागरी ३४ ते ४० किलोमीटरचे अंतर सलग १२ तासात पोहून पूर्ण करून आणखी एक विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहे. या विक्रमाच्या परीक्षणासाठी वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे उच्चाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असणार असल्याची माहिती किर्तीचे मुंबई येथील प्रशिक्षक रुपाली रेपाळे यांनी दिली.
किर्तीच्या आजपर्यंतच्या विश्वविक्रमी कामगिरीचा विचार करून भारत आणि श्रीलंका सरकारने त्यांच्या त्यांच्या हद्दीतील समुद्रात विश्वविक्रमी पोहण्यासाठी परवानगी दिली आहे. तलाईमनार ते धनुषकोडी या दरम्यानच्या अंतरात अरबी आणि हिंद अशा दोन महासागरांचा संगम आहे. त्यात किर्ती हा विश्वविक्रम करणार आहे. या विक्रमाकरिता किर्ती दि. २० सप्टेंबरच्या पहाटे दोन वाजता तलाईमनार (श्रीलंका) येथून पोहण्यास सुरुवात करणार आहे आणि दि. २० सप्टेंबरच्या दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोहत भारतातील धनुषकोडी (रामेश्वर) येथे पोहोचेल असा अंदाज आहे.
या विश्वविक्रमासाठी किर्तीला जगप्रसिद्ध जलतरणपटू रुपाली रेपाळे (ठाणे), अनिरुद्ध महाडिक, सोलापूरचे कोच श्रीकांत शेटे, सोलापूर जिल्हा होशी जलतरण संघटना, भराडिया परिवार, पुण्यातील स्कूल ऑफ फॅशन टेक्नोलॉजीचे यांचे सहकार्य लाभत आहे. या विश्वविक्रमी कामगिरीसाठी किर्तीसह भराडिया परिवारातील सदस्य तसेच आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हे रविवार, दि. १५ सप्टेंबर रोजी रात्री रवाना होत असल्याचे किर्तीचे वडील नंदकिशोर भराडिया यांनी सांगितले.
================================================================================
-
विशेष तपशील..
- विश्वविक्रमी किर्तीच्या या नव्या कामगिरीचे “ सपोर्ट गर्ल चाईल्ड” हे ब्रीद असणार आहे.
- या विश्वविक्रमाची सुरुवात कीर्ती तलाईमनार (श्रीलंका) येथून करणार, तर या कामगिरीची समाप्ती धनुषकोडी (रामेश्वर) येथे होईल
- या विश्वविक्रमाचे थेट प्रसारण यू ट्यूब लाईव्हच्या माध्यमातून करण्यात येईल.