तीन सत्रात होणार  तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन

कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सामाजिक शास्त्रे संकुल आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ तसेच जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २० जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता सात रस्ता येथील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे “आधुनिक पत्रकारिता आव्हाने आणि संधी” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन इंडिया टुडे, मुंबईचे वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांच्या हस्ते होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी दै. संचारचे संपादक धर्मराज काडादी, दै. सुराज्यचे मुख्य संपादक राकेश टोळ्ये, दै. दिव्य मराठीचे निवासी संपादक महेश रामदासी, दै. पुण्यनगरीचे वृत्तसंपादक रघुवीर शिराळकर  मान्यवर उपस्थित राहणार आहे.

प्रथम सत्रात इंडिया टुडे, मुंबईचे वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांचे मार्गदर्शन होणार असून, अध्यक्षस्थानी दै. तरुण भारत संवादचे निवासी संपादक विजयकुमार देशपांडे हे राहणार आहेत. सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या चर्चासत्रात मुंबई तकचे वरिष्ठ पत्रकार निलेश झालटे, दै. लोकमत सोलापूरचे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, दै. पुढारीचे सहायक निवासी संपादक संजय पाठक हे मार्गदर्शन करणार आहेत.

समारोप सत्रात पुणे विभागीय माहिती विभागाचे उपसंचालक डॉ. किरण मोघे आणि मुंबई येथील प्रसिद्ध मुक्त पत्रकार प्रशांत कदम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू  प्रा.डॉ. लक्ष्मीकांत दामा हे या समारोप सत्राचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

याप्रसंगी केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव,  दै. तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, दै. सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, अपूर्वाईचे संपादक डॉ. रवींद्र चिंचोलकर आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या एकदिवसीय कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थी आणि पत्रकारांना सहभाग प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व पत्रकार आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे, विद्यापीठाच्या जनसंज्ञापन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे , खजिनदार किरण बनसोडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *