मसाप दक्षिण शाखेच्यावतीने भक्तीसंगिताच्या कार्यक्रमाचे आयोजन
कन्या न्यूज नेटवर्क||
सोलापूर : सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हणत रसिका आणि सानिका कुलकर्णी या भगिनींनी भक्तीगीत सादर करीत जिल्हा कारागृहातील बंदिवानांना मंत्रमुग्ध केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा कारागृहातील बंदीवानांना भक्तीसंगीत कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. ५ जुलै रोजी सकाळी करण्यात आले होते. यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक सुशील कुंभार, उपअधीक्षक खेळबिटे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, सल्लागार अविनाश महागांवकर, नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष विजयदादा साळुंखे, विशाल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
अबीर गुलाल… रूनु झुनू रे भ्रमरा.. रंगा येई वो.. इंद्रायणी काठी… विठु माऊली तू माऊली जगाची या व अन्य असे विविध भक्तीगीते स्वर ध्यास संगीत विद्यालयाच्या संचालिका प्रसिध्द गायिका रसिका कुलकर्णी आणि सानिका कुलकर्णी यांनी सादर करून जिल्हा कारागृहातील बंदीवानांना मंत्रमुग्ध केले. जिल्हा कारागृहात बंदी म्हणून राहिलेल्या कैद्यांना मानसिक समाधान मिळावे आणि त्यांच्यामध्ये सदभावना वाढावी यासाठी विविध उपक्रमाचे कारागृह प्रशासनाकडून आयोजन केले जाते त्याच अनुषंगाने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या सहकार्याने आषाढी एकादशीचे औचित्य साधून भक्ती संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे निवेदन अतुल कुलकर्णी यांनी केले. तबल्यावर साथ अक्षय भडंगे, यश जवळकर यांनी दिली. साईडसाठी रिदम आयुष मेने व साहिल केकडे यांनी सहकार्य केले.