
अंधार अन दप्तर दिरंगाईच्या दुष्टचक्रात अडकलेल्या हेरिटेज मणिधारी सोसायटीच्या त्रस्त रहिवाश्यांचा आंदोलनाचा इशारा
by assal solapuri ||
सोलापूर: अंधार अन दप्तर दिरंगाईच्या दुष्टचक्रात अडकलेल्या हेरिटेज मणिधारी सोसायटीच्या त्रस्त रहिवाश्यांनी येत्या मंगळवार, दि. २७ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आपल्या सोसायटीतील विविध समस्या, अडी-अडचणी संबंधीच्या तक्रारी आणि गाऱ्हाणे मांडणारे निवेदने नगर अभियंता यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना सुपूर्द केले.
या संदर्भातील निवेदनाचा आशय असा की, अक्कलकोट रोड स्थित हेरिटेज मणिधारी सोसायटीचे हस्तांतरण महापालिकेला करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित विकासकांनी दि. ५ सप्टेंबर २०२३ रोजी सादर केला. तो वर्षभर रखडत ठेवला गेला. दरम्यान, हस्तांतराचे कारण पुढे करून विकासकांनी संकुलातील पथदिवे तीन महिन्यापासून बंद करून ठेवली आहेत.
त्या संबंधीचे गाऱ्हाणे मांडणारे निवेदन, तक्रारी अर्ज नगर अभियंता, संबंधित विभागातील अधिकारी- कर्मचारी यांना वारंवार भेटून त्यांना देण्यात आले. आयुक्तांच्या रजेच्या काळात उपायुक्त घोलप यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले गेले. या संदर्भात स्वतः आयुक्तांसोबतदेखील तीनवेळा भेट- चर्चा झाली आहे. परंतु हा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ स्थितीतच असल्याने प्लाॅटधारकांत असंतोष पसरला आहे. देशाचे ‘स्वातंत्र्यदिन’ अंधारात, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमासारखे सण अंधारात काढणार्या या भागातील रहिवाशी, नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जात आहे. त्यामुळेच आता संयुक्त कृती समितीने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
संकुलातील स्ट्रीट लाईट सुरु होण्यासाठी येत्या दि. २६ तारखेपर्यंत आदेश व्हावेत. अन्यथा नाइलाजास्तव महापालिका आवारात हेरिटेज मणिधारी प्लॉटधारक संयुक्त कृती समितीने मंगळवार, दि. २७ आॅगस्ट २०२४ पासून उपोषणाचा निर्धार केला आहे. अर्थात त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील, याची कृपया नोंद घ्यावी, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.