जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद; सुशासन सप्ताहानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा

ॲड. जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायदेविषयक सविस्तर मार्गदर्शन

 कन्या न्यूज नेटवर्क ||

सोलापूर : जिल्ह्यात दि. १९ ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा केला जात आहे, याच अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी व त्यांच्या अधिनस्त सर्व कार्यालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी तसेच आपले पोर्टल सरकारवर येणाऱ्या विविध तक्रारींचा त्वरित निपटारा करावा. आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यापर्यंत अत्यंत गतिमान पद्धतीने पोहोचवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
देशाचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दि.२५ डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेप्रमाणे  दि. १९ ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत जिल्हास्तरावर सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सुशासन कार्यशाळेत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार, ॲडव्होकेट जगदीश धायतिडक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व जिल्हास्तरीय अधिकारी तहसीलदार उपस्थित होते.

      जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, शासनाने सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात न येता त्यांच्या तक्रारी त्यांना योग्य पद्धतीने करता येतील व त्याचा वेळेत निपटारा होऊन त्यांना समाधान मिळेल व गतिमान पद्धतीने शासनाचे काम होईल याकरता आपले सरकार पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांनी आपले सरकार पोर्टलवर आलेल्या सर्व प्रकारच्या तक्रारींची अत्यंत गांभीर्यपूर्वक दखल घेऊन त्याचा वेळेपूर्वी निपटारा करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

  • प्रत्येक तहसील कार्यालयामार्फत एक क्यूआर (QR) कोड तयार करावा. हा कोड त्या तहसील कार्यालयातील प्रत्येक गावापर्यंत व नागरिकांपर्यंत पोहोचल याची काळजी घ्यावी.
  • हा क्यू आर कोड स्कॅन करून त्या तहसील कार्यालय व तालुकास्तरीय यंत्रणाबाबत नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी नागरिकांमार्फत केल्या जातील व त्याचा निपटारा तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणेने त्वरित करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. 
  • जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजनेचा लाभ मिळत आहे की नाही याबाबत खात्री करण्यासाठी एका एजन्सी मार्फत दररोज किमान १ ते २ हजार नागरिकांना फोन कॉल करण्यात येतील व त्यांना मिळणाऱ्या योजनेविषयी माहिती घेतली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी सुशासनाचे महत्त्व सांगून प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात आलेल्या तक्रारींच्या वेळेत निपटारा होण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना केली.  आजच्या जिल्हास्तरीय सुशासन सत्ता कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक ॲड. धायतिडक  यांनी महसूल प्रशासनातील दिवाणी व महसुली कायद्याचे महत्त्व सांगून त्या कायद्याच्या अनुषंगाने कशा पद्धतीने कोणत्या कलमाखाली कार्यवाही करावयाची याची अत्यंत बारकाईने माहिती दिली.

यावेळी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते सन्मानपत्र वितरित करण्यात आले. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी सुशासन सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. आभार प्रदर्शन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *