ढोर समाजाच्या देशव्यापी मेळाव्यात नवे शिक्षण धोरण, आरक्षण वर्गीकरणावर चर्चा
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : मागासवर्गीय गटात ढोर समाज संख्येने कमी असला तरी आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे. त्यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करून कक्कय्या आर्थिक विकास महामंडळासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. ढोर समाजाच्या देशव्यापी मेळावा रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, धर्माजी सोनकवडे, गुरूमाता, राजेश खंदारे आदी उपस्थित होते.
प्रत्येकाला जातीचा अभिमान असला पाहिजे आणि प्रत्येकाने समाजासाठी काम केले पाहिजे समाजातील मुलींना चांगले शिक्षण दिले पाहिजे, असे मत माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांनी व्यक्त केले.
समाजाच्या विकासासाठी मी कायम सोबत राहणार आहे. समाजाच्या अनेक अडचणी आहेत. आरक्षणामध्ये इतर जाती घुसल्यामुळे आपल्या समाजावर अन्याय होत आहे, त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. म्हणून प्रत्येकाने संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले.
प्रास्ताविक मेळाव्याचे संयोजक लक्ष्मीदास सोनकवडे यांनी केले. समाजात अंतर्गत जनगणना केली तर आपण किती आहोत याची संख्या कळेल त्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे, सर्वांनी सहकार्य करावे.
आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आदी राज्यातून आलेल्या अनेक मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर देशभरात समाजाचे नावलौकीक वाढवणार्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा.प्रविण होटकर आणि वनिता होटकर यांनी केले. आभार प्रदर्शन सटवाजी होटकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुधीर खरटकमल, मुन्ना कटके, सच्चिदानंद होटकर, अशोक सदाफुले, रविंद्र शिंदे, संगीता जोगधनकर, शारदा शिंदे, अॅड. विद्या कटकधोंड, राजेश कटकधोंड, विनोद होटकर, नित्यानंद सोनकवडे, विनायक होटकर, गणेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.