महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५ : २० संघाचा सहभाग : सुयोग गायकवाड यांची माहिती

कन्या न्यूज नेटवर्क||

सोलापूर : “गोडवा साखरेचा… जल्लोष क्रिकेटचा!” या संकल्पनेतून सोलापूर पर्व-२०२५ अंतर्गत सोलापुरात येत्या २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२५ दरम्यान ‘महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५’ मर्यादित ८ षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माहिती सिताराम महाराज आणि आष्टी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक  ३ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक २ लाख रुपये, तृतीय पारितोषिक १ लाख रुपये असे ठेवण्यात आले आहे. मालिकावीरसाठी एक ईलेक्ट्रिक स्कूटर बक्षिसाच्या स्वरुपात देण्यात येणार आहे. सर्वोत्तम गोलंदाज व फलंदाजासाठी प्रत्येकी  ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

खर्डी (ता.पंढरपूर) येथील सिताराम महाराज साखर कारखान्याच्यावतीने महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारच्या टेनिसबॉल फुलपीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. यामध्ये जवळपास जिल्ह्यातील २० साखर कारखाना संघ सहभागी होणार आहेत. ‘महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५’ या  स्पर्धा  दयानंद महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहेत. याचा उद्घाटन सोहळा दि. २ ऑगस्ट  हरिभाई  देवकरण प्रशालेच्या पटांगणावर होत आहे.

महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग-२०२५ (एम.एस.सी.एल.-२०२५) ही स्पर्धा केवळ क्रिकेट स्पर्धा नसून, सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्याचा आणि त्यांच्यातील ऊर्जा, एकोपा आणि क्रीडाभाव वाढवण्याचा एक अभिनव उपक्रम आहे. ‘गोडवा साखरेचा आणि जल्लोष क्रिकेटचा’ या संकल्पनेतून स्पर्धा आयोजनाचा विचार पुढे आला. याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता, आगामी काळात राज्यस्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, अके सुयोग गायकवाड यांनी सांगितले. हॉटेल सूर्या एक्झिक्युटिव्हमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये स्पर्धेच्या लोगोचे अनावरण अन् टीझर लाँचिंग करण्यात आले. यावेळी स्पर्धेतील सहभागी संघांची यादी, प्रवेश शुल्क, नियमावलीसह स्पर्धेशी निगडीत महत्त्वाची माहिती देण्यात आली.

या स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील काही नामांकित चेहरे तसेच “महाराष्ट्राची हास्य जत्रे”मधील कलाकारांश विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे चेअरमन, पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

या पत्रकार परिषदेस भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक ऋतुराज सावंत, विविध साखर कारखान्यांचे संचालक, व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, अधिकारी वर्ग आणि स्पर्धेतील सहभागी सर्व २० संघांचे कर्णधार उपस्थित होते.

 

ही स्पर्धा जिल्ह्याच्या सामाजिक अन् औद्योगिक विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरेल : सुयोग गायकवाड

“या अनोख्या क्रिकेट लीगला सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. संचालक, अधिकारीवर्ग, कामगार यांचा उत्स्फूर्त सहभाग या लीगमधून एकात्मता व बंधुभावाचे दर्शन घडवत आहे. ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता, सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरेल.”

असा आहे या स्पर्धेचा तपशील :

  • उद्घाटन समारंभ:

  • दि. २ ऑगस्ट २०२५, हरिभाई देवकरण प्रशालेचे मैदान, सोलापूर
  • स्पर्धेतील सामने:
  • दि. ३ ऑगस्ट ते दि. १० ऑगस्ट २०२५, दयानंद कॉलेज मैदान, सोलापूर
  • स्पर्धा स्वरूप: नॉकआऊट (बाद फेरी) पध्दत
  • थेट प्रसारण: विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर

अशी आहेत पारितोषिके:

  • प्रथम पारितोषिक : ३ लाख रुपये.
  • द्वितीय पारितोषिक : २ लाख रुपये.
  • तृतीय पारितोषिक : १ लाख रुपये.
  • मॅन ऑफ द सिरीज (मालिकावीर) ईलेक्ट्रिक स्कूटर
  • सर्वोत्तम गोलंदाज व फलंदाज : प्रत्येकी ५१ हजार रुपये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *