दुसऱ्या दिवसाअखेर विदर्भाच्या २ बाद  ५४ धावा

महाराष्ट्र V/s विदर्भ रणजी संभाव्य संघ दुसरा सराव सामना

महाराष्ट्राच्या यश क्षीरसागरचे शतक दोन धावांनी हुकले

विदर्भाच्या पार्थ रेखाडेचे चार बळी

कन्या न्यूज नेटवर्क ||

 सोलापूर : येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी संभाव्य संघाच्या दुसऱ्या सराव सामन्यात दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेंव्हा विदर्भ संघाने १९ षटकात २ बाद ५४ धावा केल्या. तत्पूर्वी महाराष्ट्राने पहिला डाव चहापानाच्या आधी ९ बाद ३११ धावांवर डाव घोषित केला. महाराष्ट्रकडून यश क्षीरसागरने दमदार खेळी करीत ९८ धावा केल्या.

             पार्थ रेखाडे

कालच्या ३ बाद १५३  धावांवरून महाराष्ट्राच्या यश क्षीरसागर आणि मंदार भंडारी यांनी सकाळी डाव पुढे सुरू केला. संघाच्या १८० धावा असताना मंदार भंडारी ३१ धावांवर बाद झाला. यशने ९९ चेंडूमध्ये अर्धशतक झळकावले. अझीम काझी (२१) याने यशसोबत ४२ धावांची भागीदारी रचली. काझीनंतर लगेच ३ चेंडूत कर्णधार निखील नाईकला शून्यावर बाद करीत पार्थ रेखाडेने फिरकीचे जाळे टाकले. त्यानंतर आलेल्या अर्शिन कुलकर्णी (२२) याने यशसोबत ५४ धावांची भागीदारी केली. पण पुन्हा एकदा पार्थने फिरकीच्या जाळ्यात अर्शिन पाठोपाठ तरणजितसिंग धिल्लोन (००) याला फसविले. तळातील फलंदाज म्हणून आलेल्या रामकृष्ण घोष (११) याने यशसोबत ३५ धावा जोडल्या.

संयमी आणि प्रसंगी दमदार फलंदाजी करीत शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या यशला सन्मेश देशमुखने झेलबाद केले आणि महाराष्ट्राने डाव घोषित केला. विदर्भकडून पार्थ रेखाडे याने ६० धावांत चार बळी,  हर्ष दुबेने ४१ धावांत  दोन बळी,  दर्शन नालकांडे, ललित यादव,, सन्मेश देशमुख यांनी प्रत्येकी एकेक बळी मिळवले.

यश क्षीरसागर

विदर्भाच्या पहिल्या डावाची सुरुवात अथर्व तायडे व सत्यम भोयर यांनी केली. अथर्व तायडे (१०) याने पहिल्याच षटकात मुकेश चौधरीला २ खणखणीत चौकार लगावल्यानंतर शेवटच्या चेंडूवर मुकेशने पुन्हा एकदा, सलग तिसऱ्यांदा पहिल्या षटकात गडी बाद करीत विदर्भाला झटका दिला. चहापानाला खेळ थांबला तेव्हा विदर्भाने १० षटकात १ बाद २८ धावा केल्या होत्या. नंतर आलेल्या यश राठोडने ३१ धावांची भागीदारी रचली. सत्यम भोयर (१५) याला रामकृष्ण घोषने यष्टिमागे निखील नाईक करवी झेलबाद केले. पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबविला तेव्हा १९ षटकात २ बाद ५४ अशी स्थिती असून, सामन्याच्या तिसऱ्या व शेवटच्या दिवशी विदर्भ संघ पहिल्या डावात किती धावा करतो, ते पाहावे लागेल. महाराष्ट्राचे वेगवान की गो  फिरकीपटू यांची कामगिरी सरस राहील, हेही पाहावे लागेल.

निवड समिती सदस्य संग्राम अतीतकर, किरण आढाव आणि रोहित जाधव हे दिवसभर स्टेडियमवर उपस्थित होते. सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सू यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पदाधिकाऱ्यांच्या साह्याने आयोजन समितीकडून सामन्याचे तसेच दोन्ही संघांचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× Contact