पहिल्या डावाच्या आघाडीवर महाराष्ट्र विजयी; त्रिपुराकडून श्रीदाम पॉलचे दमदार शतक; कर्णधार मनदीप सिंगच्या संयमी नाबाद ७७ धावा
कन्या न्यूज नेटवर्क ||
सोलापूर : गेल्या तीन दिवसापासून सोलापुरात चालू असलेला महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा रणजी सामना अखेर निर्मित अवस्थेत संपला. पहिल्या डावाच्या आघाडीवर महाराष्ट्र विजयी ठरला असून, ३ गुण प्राप्त करीत गटात १७ गुण मिळविले, त्रिपुराला एक गुण मिळाला. महाराष्ट्रकडून पहिल्या डावात दमदार शतक झळकविलेल्या सिद्धेश वीरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

चौथ्या दिवशी २ बाद १३५ वरून त्रिपुराने आपला दुसरा डाव पुढे सुरू केला. तेव्हा चौथ्याच षटकात संकर पॉल (८) हितेश वाळुंजकडून त्रिफळाचीत झाला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १२८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार मनदीप सिंग फलंदाजीला आला तेव्हा मैदानावर उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष करत त्याचे स्वागत केले. काहीशा जखमी अवस्थेत फलंदाजी करत मनदीपने साथ दिल्याने श्रीदाम पॉलने पहिल्या तासात दमदार शतक साजरे केले. दोघांनी ८३ धावांची भागीदारी केल्यावर श्रीदाम (१२८) याला सोळंकीने वीरद्वारे टिपले.त्यापाठोपाठ एम.बी.मुरा सिंग (२) देखील वाळुंजच्या गोलंदाजीवर बाद झाला. जेवणाला खेळ थांबला तेव्हा ५ बाद २५७ अशी धावसंख्या होती. तेव्हा मनदीप सिंग हा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर होता.
पुन्हा खेळ सुरू झाल्यावर श्रीनिवास शरथ (नाबाद ३७) याने साथ देत मनदीपने संयमी अर्धशतक पूर्ण केले.चहापानाला ३० मिनिटे शिल्लक असताना दोन्ही कर्णधारांनी संमतीने खेळ थांबविण्याबद्दल पंचांना सांगितले तेव्हा मनदीप नाबाद (७७) राहिला.महाराष्ट्रकडून हितेश वाळुंज १०६ धावात दोन बळी, तर घोष-दाढे- प्रशांत सोळंकी यांनी प्रत्येकी एकेक बळी मिळविला.सामना संपल्यावर सामनाधिकारी यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन करत सामनावीर म्हणून सिद्धेश वीरची घोषणा केली तेव्हा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी टाळ्या वाजवत त्याचे अभिनंदन केले.
सोबत फोटो
– सिद्धेश वीर याला सामनावीर पुरस्कार देताना सामनाधिकारी